‘ओबीसीं’ना संसदेत बोलू दिले जात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 00:55 IST2016-04-09T00:21:44+5:302016-04-09T00:55:57+5:30
वामन मेश्राम : भारत मुक्ती मोर्चाचे बारा बलुतेदार संमेलन

‘ओबीसीं’ना संसदेत बोलू दिले जात नाही
कोल्हापूर : ‘ओबीसी’ लोकप्रतिनिधींना आपल्या जातीच्या प्रश्नावर संसदेत बोलू दिले जात नाही, त्यांचे राजकीय पक्ष व व्यवस्था हे त्यांना करूदेत नाही, असा जोरदार आरोप भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे केला.
‘भारत मुक्ती मोर्चा’तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या समारोप कार्यक्रमांतर्गत दसरा चौक मैदानावर बारा बलुतेदार जातींचे राज्यस्तरीय संमेलन आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण हेंद्रे, डॉ. सूरज पवार, डॉ. संदीप पाटील, अॅड. नीता मगदूम, बबन रानगे, बसवंत पाटील, केरबा सुतार, विश्वास सुतार, राजेंद्र ढवळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
वामन मेश्राम म्हणाले, बारा बलुतेदार फक्त महाराष्ट्रात नाही तर ते देशभरात ‘जजमानी’ या नावाने परिचित आहेत. या बलुतेदारांचे अशा स्वरूपाचे संमेलन भरविण्यामागील उद्देश म्हणजे या ८५ टक्केलोकांसाठी सोशल नेटवर्किंगचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून सहा हजार जातींच्या लोकांना जागे करण्याचे काम करणे, त्यानंतर त्यांना जोडणे, त्यांच्यात शक्ती निर्माण करणे, या शक्तींचा संचय करणे, या संचयित शक्तीचा प्रयोग व उपयोग करणे अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असणार आहे.
ते पुढे म्हणाले, ओबीसी तसेच भटक्या विमुक्त जातींचे नेतृत्व करणाऱ्यांनाच संविधान नीट समजलेले नाही. कारण या जातींमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी या जातींच्या प्रश्नांवर संसदेत अथवा विधिमंडळात कधीही बोलताना दिसत नाहीत. जर ते बोलत नसतील तर ते या जातीचे प्रतिनिधी कसले? त्यांना काय चाटायचे आहे? तसेच ओबीसी जातीच्या लोकप्रतिनिधींना संसदेत बोलूही दिले जात नाही. त्यांना रोखले जाते. यामागे त्यांचा पक्ष व व्यवस्थेचा दबाव कारणीभूत असतो. बहुदा त्यांना संविधानाने दिलेल्या बोलण्याच्या मौलिक अधिकाराची जाणीव
नसावी.
डॉ. हेंद्रे म्हणाले, कठोर परिश्रम व शिक्षण याशिवाय आपल्याला पर्याय नाही; परंतु ते करणे आपल्या हातात आहे. बबन रानगे म्हणाले, बारा बलुतेदारांमध्ये नेतृत्व निर्माण करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी शैक्षणिक वसतिगृहे स्थापन केली.
यावेळी विश्वास सुतार, बी. डी. सुतार, बसवंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)