रोपवाटिका उद्योगामुळे शंभर कुटुंबे बनली स्वयंपूर्ण !
By Admin | Updated: June 10, 2016 00:18 IST2016-06-09T23:20:43+5:302016-06-10T00:18:48+5:30
शिरदवाडच्या लक्ष्मण कुंभार यांची यथोगाथा : राज्य शासनाकडून प्रशिक्षण देण्यासाठी निवड

रोपवाटिका उद्योगामुळे शंभर कुटुंबे बनली स्वयंपूर्ण !
घन:शाम कुंभार-- यड्राव --काही वर्षांपूर्वी प्रत्येक कामात अपयश झेलणाऱ्या व सर्वांकडून टीकेचा धनी बनलेली व्यक्ती अपार कष्ट, प्रामाणिकपणा, संवाद कौशल्यासह अनुभवाच्या बळावर यशस्वी होते. शिरदवाड (ता. शिरोळ) येथील दहावी नापास असलेले लक्ष्मण दुंडाप्पा कुंभार यांनी स्वबळावर सार्थ केले आहे. सन २००८ मध्ये प्लास्टिक ट्रेमध्ये कोकोपीठ घालून ऊस रोपे तयार करण्याचा पहिला प्रयोग यशस्वी झाला अन् टीकेचा धनी असलेले अभिमानाचा मानबिंदू बनले. त्यांना शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी सहायकांना प्रशिक्षण देण्यासाठी निवडले आहे. कुंभार यांनी शंभर कुटुंबांना ऊस रोपवाटिका उद्योग करण्यास प्रवृत्त करून त्यांना स्वयंपूर्ण बनविले आहे. त्यांची यशोगाथा नव्या पिढीस प्रेरणादायी आहे.शिरदवाड येथील लक्ष्मण कुंभार दहावी नापास. शेती कमी यामुळे वेगवेगळी कामे केली; परंतु त्यामध्ये सतत अपयश आल्यामुळे समाजामध्ये पत्नी-मुलाशिवाय कोणाचेही पाठबळ मिळाले नाही. वेगवेगळे अनुभव, कष्ट करण्याची जिद्द मात्र वाढत होती. त्यातून २००७ मध्ये प्लास्टिक पिशवीतून ऊस रोपे तयार करण्यास सुरुवात केली. रोपांची उचल सुरू झाल्याने २००८ मध्ये प्लास्टिक ट्रेमध्ये कोकोपीठ घालून ऊस रोपे करण्याचा या भागात पहिलाच प्रयोग त्यांनी केला. त्यात त्यांना यश मिळाले आणि यशाचा मार्ग खुला झाला.
स्वत:च्या विकासाबरोबर इतरांचा विकास असा स्वभाव असल्याने नातेवाइकांना ऊस रोपवाटिका करण्यास प्रवृत्त केले. त्यांना लागणारे मार्गदर्शन, बियाणे, प्लास्टिक ट्रे, कोकोपीठ देणे, त्यांनी तयार केलेल्या रोपांच्या विक्रीची जबाबदारी घेतली. समाजातील ८० लोकांनी ऊस रोपवाटिका उद्योग सुरू केला आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांचा आर्थिक स्तर उंचावत आहे.
कृषी विभागामार्फत मार्गदर्शन --लक्ष्मण कुंभार यांना कोल्हापूर, सांगली, सातारा येथील कृषी सहायकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाकडून निवड करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षण शिरदवाड येथील शेतात होते. त्याचबरोबर कर्नाटकमधील धर्मस्थळ संस्थानच्या शिष्टमंडळाने ऊस रोपवाटिकेसाठी प्रशिक्षण घेतले आहे. ऊस व भाजीपाला यावरील समस्या मोफत उपायांसाठी ते ९९७०६०३९५० या मोबाईल नंबरवर उपलब्ध असतात.
ऊस रोपांना मागणी
सोलापूर, बेळगाव, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांकडून कुंभार यांनी तयार केलेल्या ऊस रोपांना मागणी आहे, तर बेळगाव, सांगली, विजापूर, सोलापूर, रत्नागिरी, नांदेड येथूनही शेतकरी ऊस रोपवाटिका पाहून रोपांची खरेदी करतात.