नंबर एक, दोनवर कोण याची चर्चा

By Admin | Updated: June 19, 2015 00:20 IST2015-06-18T22:09:44+5:302015-06-19T00:20:16+5:30

निकालावर लागल्या पैजा : सभेच्या गर्दीवरून व्यक्त होतायत अंदाज

The number one, the one who discusses it | नंबर एक, दोनवर कोण याची चर्चा

नंबर एक, दोनवर कोण याची चर्चा

अशोक पाटील - इस्लामपूर -कृष्णा साखर कारखान्याचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला असून, कऱ्हाड, वाळवा, कडेगाव तालुक्यात निकालावर पैजा लागल्या आहेत. जिंकेल कोण, यापेक्षा नंबर एक, दोन व तीनवर कोणते पॅनेल राहील, याचीच चर्चा रंगू लागली आहे. ‘जसा भगत तशी गाथा’ या म्हणीप्रमाणे ज्या पॅनेलचा कार्यकर्ता भेटेल, त्याला त्याच्या सोयीप्रमाणे निकालाचे अंदाज सांगितले जात आहेत.
विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्याविरोधात रयत पॅनेलचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी एक वर्षापासून मोर्चेबांधणी केली होती. त्यांचे बंधू मदनराव मोहिते सवतासुभा मांडण्याच्या तयारीत असतानाच काँग्रेसच्या काही नेत्यांनी दोघांची मोट बांधली. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुल भोसले यांनी या दोन बंधूंना संपविण्याचा विडा उचलला.
या घडामोडीत अविनाश मोहिते यांचे कार्यकर्ते भोसले गटाकडे विखुरले गेले. मात्र प्रारंभीच्या काळात नंबर एकला इंद्रजित मोहिते असल्याची चर्चा रंगू लागली होती.
डॉ. भोसले यांच्या पाठीशी माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांची ताकद आहे, तर डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी माजी मुख्यमंत्र्यांसह पतंगराव कदम यांची ताकद आहे. शेकापचे प्रा. एन. डी. पाटील आणि श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी अविनाश मोहिते यांना बळ दिले आहे. आता त्यांच्या सभेसाठी होत असलेली गर्दी पाहून नंबर एकला अविनाश मोहितेच राहतील, अशी चर्चा त्यांचे कार्यकर्ते करू लागले आहेत.
सहकार पॅनेलच्या भोसले यांनी साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करत मोहिते बंधूंना ‘टार्गेट’ केले आहे. भोसले पूर्ण ताकदीसह उतरल्याने आणि त्यांना विलासकाकांंची ताकद मिळाल्याने दक्षिणेतील बऱ्यापैकी मते त्यांना मिळतील, असा सूर परिसरात उमटत आहे.


मतांसाठी दमबाजी
इस्लामपूर शहर व परिसरातील काही बडे नेते मतासाठी दमबाजी करत असल्याची चर्चा आहे. जे सभासद आर्थिक संकटात आहेत, त्यांना मदत करून नोकरी देण्याचे आमिषही दाखवले जात आहे. यांच्यामुळे शेवटच्या टप्प्यात मताचाही भाव वधारला जाणार आहे, असे बोलले जाते. त्यामुळे या निवडणुकीमध्ये दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे.
सहकार पॅनेलच्या भोसले यांनी मोहिते बंधूंना या निवडणुकीमध्ये ‘टार्गेट’ केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमका विजय कोणाचा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The number one, the one who discusses it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.