रोखीच्या व्यवहारामुळेच हातगाड्यांची संख्या वाढतेय

By Admin | Updated: December 2, 2014 23:17 IST2014-12-02T23:06:58+5:302014-12-02T23:17:38+5:30

इचलकरंजी परिसर : परवाना पद्धत अवलंबल्यास नियंत्रण शक्य

The number of handpumps increases due to cash transactions | रोखीच्या व्यवहारामुळेच हातगाड्यांची संख्या वाढतेय

रोखीच्या व्यवहारामुळेच हातगाड्यांची संख्या वाढतेय

राजाराम पाटील- इचलकरंजी --अल्प भांडवलात चांगला नफा आणि रोखीने व्यवहार होणारा व्यवसाय म्हणून हातगाडीवरून खाद्यपदार्थ विक्रीच्या धंद्याकडे पाहिले जात असल्याने इचलकरंजीत हातगाड्यांची संख्या बोकाळली आहे. नगरपालिकेकडे सुमारे २३०० हातगाडीधारकांनी फेरीवाले पुनर्वसनासाठी अर्ज दाखल केले असून, साडेचार हजार फेरीवाल्यांची संख्या आहे.
खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्यांची अन्न व भेसळ प्रतिबंधक किंवा नगरपालिका अथवा पोलिसांकडे कोणतीही नोंद नसल्याने एखाद्या गाडीवर विषबाधेसारखी गंभीर घटना घडल्यास कोणावर कारवाई करावयाची, असा प्रश्न आहे. याबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
शहरात विविध ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांचे पुनर्वसन आणि ‘हॉकर्स झोन’ व ‘नो हॉकर्स झोन’ निर्माण करण्यासाठी नगरपालिकेत एक समिती स्थापन झाली. पुनर्वसनासाठी फेरीवाल्यांकडून मागविण्यात आलेल्या अर्जामध्ये २२५५ अर्ज हातगाडीधारकांचे असल्याचे सांगण्यात आले. वास्तविक पाहता समितीने अर्ज मागविणे व शहरात फेरीवाल्यांसाठी जागा सूचविणे, इतकेच काम समितीचे आहे. समितीने सूचविलेल्या जागांचे आरक्षण करण्याची शिफारस पालिकेच्या सर्वसाधारण सभेने करावयाची आहे आणि या जागा शासनाच्या नगररचना विभागाकडून आरक्षित केल्या जातील.
दरम्यान, वरील प्रक्रियेचा ‘लाभ’ उटवित, दोघा महाभागांनी फेरीवाल्यांबरोबर ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटी केल्या. नगरपालिकेच्या जागेवर पुनर्वसनासाठी जणू काही सर्वाधिकार असल्याचे फेरीवाल्यांना भासविण्यात आले. यामध्ये सोळा लाखांची माया जमविल्याचे सांगण्यात आले. याची चौकशी व्हावी, अशी मागणी होतेय.
फेरीवाले - हातगाडीधारकांचे प्रामाणिकपणे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेकडे आलेल्या अर्जांची अन्न व भेसळ प्रतिबंधक खाते, नगररचना विभाग, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने छाननी करावी.
ज्यामुळे गरजवंतांनाच हातगाडी चालविण्याचे परवाने मिळतील.
ज्या हातगाडीधारकांचे किंवा त्याच्या जवळच्या नातलगांचे हॉटेल-
उपहारगृह असल्यास त्यांचे अर्ज अवैध ठरवावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.++


चौक रिकामे करण्याची मागणी
शहरातील प्रमुख चौकांत असलेल्या आणि रहदारीस अडचण ठरणाऱ्या हातगाड्या व फेरीवाले तातडीने अन्यत्र हलविण्यात यावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
त्याचबरोबर चिकन ६५ विक्रीच्या हातगाड्यांभोवती असलेल्या कुत्र्यांच्या कळपांचा बंदोबस्तसुद्धा नगरपालिकेने युद्धपातळीवर करावा, अशी मागणी महिलावर्गातून होत आहे.


पन्नास हजार ते दीड लाख दर
शहरातील काही मोक्याच्या जागी हातगाडी चालू करावयाची असल्यास त्याचे दर ठरलेत.
सुंदर बागेजवळ एक ते दीड लाख, डेक्कन-शिवाजी पुतळा परिसरात एक लाख, जय सांगली नाका-नदीवेस किंवा एएससी कॉलेज परिसरात पन्नास हजार ते एक लाख असा भाव असल्याची संबंधितांत चर्चा आहे.
काही मंदिरांच्या बाहेर नारळ-पूजेचे साहित्य विक्रीच्या जागेससुद्धा पन्नास हजारांचा भाव आहे.

Web Title: The number of handpumps increases due to cash transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.