हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांनाच बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:18+5:302021-01-17T04:22:18+5:30
कोल्हापूर : हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांनाच फरशी, काठीने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी मंगळवार पेठेतील लाड ...

हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांनाच बेदम मारहाण
कोल्हापूर : हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांनाच फरशी, काठीने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी मंगळवार पेठेतील लाड चौकात घडली. नरेंद्र महेश काटवे (वय २५), दिनेश काटवे (वय २३, दोघेही रा. १७३१ बी वॉर्ड, लाड चौक, मंगळवार पेठ), अशी जखमी भावांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नरेश व दिनेश काटवे हे दोघे वातानुकूलित यंत्र दुरुस्तीचे काम करतात. शनिवारी ते गांधीनगरातील काम आटोपून सायंकाळी घरी परतले. त्यावेळी चौकात महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटांत वाद सुरू होता. त्यापैकी एक गट तेथून पसार झाला, पसार झालेल्या जमावातील एक युवक विरोधी गटाच्या हाती लागला. त्याला मारहाण करीत असल्याचे पाहून नरेश व दिनेश काटवे हे दोघे घरातून बाहेर आले. वाद मिटविण्याचा त्यांनी प्रयत्न केला; पण त्यावेळी काटवे बंधू हे त्या विरोधी गटातीलच असल्याचा समज करून दोघा भावांना जमावाने रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जमावातील काहींनी नरेश काटवे याच्या डोक्यात फरशी मारल्याने तो गंभीर जखमी झाला, तर काठीने मारहाण केल्याने दिनेश काटवे हाही जखमी झाला. हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. एका रिक्षाचालकाने हल्ल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना कळविली. त्यानुसार पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. जखमी काटवे बंधूंना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हल्लेखोरांचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज पोलिसांच्या हाती
हल्लेखोर अज्ञात असल्याने पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, त्यावेळी एका ठिकाणी हल्लेखोरांचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा नोंदविला आहे. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस हल्लेखोरांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते.