त्या ‘नकुशी’चा मृत्यू
By Admin | Updated: July 11, 2016 01:09 IST2016-07-11T01:09:45+5:302016-07-11T01:09:45+5:30
खासगी रुग्णालयात दोन महिने सुरू होते उपचार

त्या ‘नकुशी’चा मृत्यू
कोल्हापूर : मे महिन्यात गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील एका बोळामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत सापडलेल्या ‘त्या’ नकुशीचा शनिवारी सायंकाळी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
विचारे माळ येथील हसीना सय्यद यांना दोन मुलींनंतर तिसरा मुलगा झाला, चौथी मुलगी झाली आणि पाचवाही मुलगाच होईल, अशी आशा होती; परंतु, मुलगी झाल्याने तिचा सांभाळ आपला भाऊ करील, म्हणून त्यांनी त्या ‘नकुशी’ला भावाच्या दारातच सोडून दिले होते. तिच्या मृत्यूमुळे दुरान्वयाने का होईना, ‘ती’ माताच तिची वैरिण ठरली.
मे महिन्यात गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील एका बोळामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत दोन दिवसांची नवजात बालिका सापडली. याबाबत पोलिसांनी तपास करून हसीना आणि रशीद सय्यद या तिच्या आई-वडिलांचा छडा लावला, त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी मुलगी झाली म्हणून हसीना हिने ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील आपला भाऊ सलीम शेख याच्या दारात प्लास्टिक पिशवीमध्ये दोन दिवसांच्या नवजात बालिकेला ठेवल्याची कबुली दिली होती.
तिच्यावर प्रथम छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालय येथे उपचार सुरू होते. तिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बालकल्याण समितीने तिचा ताबा जरगनगरातील डॉ. प्रमिला जरग यांच्या शिशू आधार केंद्राकडे दिला होता. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, ती ‘नकुशी’ जरगनगरातील शिशू आधार केंद्रात ती रमली होती. मात्र, तिची प्रकृती पुन्हा बिघडल्याने तिला पुन्हा ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आल्याचे समजले.
‘सीपीआर’मध्येही उपचार सुरू असताना तिची तब्येत आणखीनच खालावल्याने तिला पुन्हा एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र, शनिवारी उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
या बालिकेवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे समजले असल्याची माहिती बालकल्याण समितीच्या अध्यक्षा प्रिया चोरगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)