...आता दहाच्या आत कार्यालयात
By Admin | Updated: November 25, 2014 00:01 IST2014-11-24T23:37:51+5:302014-11-25T00:01:01+5:30
कारवाईवर पदाधिकारी ठाम : जिल्हा परिषदेतील बायोमेट्रिकमधील सावळा गोंधळ उघड

...आता दहाच्या आत कार्यालयात
कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी लेटकमर्सना चांगलाच दणका दिल्यानंतर आज, सोमवारी सर्वच कर्मचारी कार्यालयात दहाच्या आत उपस्थित राहिले. दरम्यान, प्रशासनाने एकूण ३६५ कर्मचारी असल्याची माहिती दिली होती. मात्र, बायोमेट्रिकमध्ये ५५२ कर्मचारी असल्याचे उघड झाल्यामुळे सामान्य प्रशासनातील गलथान कारभार समोर आला आहे. लेटकमर्स आणि आंदोलकांवर कारवाई झालीच पाहिजे, यासाठी उपाध्यक्ष खोत पाठपुरावा करीत आहेत. यामुळे कर्मचारी विरुद्ध पदाधिकारी, असा वाद चिघळला आहे.
शुक्रवारी (दि. २१) उपाध्यक्ष खोत यांनी सकाळी दहा वाजता येऊन कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोखले होते. त्या दिवशी सामान्य प्रशासनाकडून एकूण ३६५ कर्मचाऱ्यांपैकी ११५ कर्मचारी उशिरा आल्याचे सांगण्यात आले. यानुसार बायोमेट्रिकमध्ये ३६५ कर्मचारी असणे आवश्यक आहे. परंतु, आज उपाध्यक्षांनी माहिती घेतल्यानंतर बायोमेट्रिकमध्ये ५५२ कर्मचाऱ्यांची नोंद असल्याचे स्पष्ट झाले. संघटनेतील काही कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येताना ‘थंब’ दिले आहे. मात्र, जाताना ‘थंब’ केले नसल्याचे उघड झाले आहे. (प्रतिनिधी)
कर्मचारी, पदाधिकारी यांच्यातील वाद मिटवण्यासाठी कक्षामध्ये बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लेटकमर्सबाबत अधिकारी काय भूमिका घेतात, ते पाहूया.
- विमल पाटील,
अध्यक्षा-जिल्हा परिषद.
सामान्य प्रशासन ३६५ कर्मचारी असल्याचे सांगत होते. मात्र, आज माहिती घेतल्यानंतर बायोमेट्रिकमध्ये ५५२ कर्मचारी असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे बायोमेट्रिकला इतक्या मोठ्या संख्येने कर्मचारी वाढले कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचबरोबर लेटकमर्स, आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी आग्रही आहे.
- शशिकांत खोत, उपाध्यक्ष