आता कुठे आयुष्याची घडी बसत होती, पण...

By Admin | Updated: August 27, 2015 00:30 IST2015-08-27T00:30:07+5:302015-08-27T00:30:07+5:30

कंटनेर अपघाताचा फटका : मिठारी कुटुंबीयांना मानसिक धक्का; उपचारासाठी लाखांचा खर्च अपेक्षित

Now where was the moment of life, but ... | आता कुठे आयुष्याची घडी बसत होती, पण...

आता कुठे आयुष्याची घडी बसत होती, पण...

प्रदीप शिंदे - कोल्हापूर म्हैसपालनातून मिळणाऱ्या दुधाच्या व्यवसायावरच घराचा डोलारा उभा होता. याला हातभार म्हणून राहुलने सहा महिन्यांपूर्वीच जुनी रिक्षा घेतली. सकाळी रिक्षा व रात्री ताराबाई रोडवर भजी-पावच्या गाडीवर कामाला जाऊन राहुल घरच्यांना हातभार लावू लागला. कष्टांमुळे आता कुठे घडी बसत असताना, शाहूपुरीतील ब्रेक फेल झालेल्या कंटेनरच्या अपघाताने मिठारी कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. राहुलवरील उपचार व शस्त्रक्रियेसाठीचा खर्च लाखोंच्या घरात असल्याने हे कुटुंब विवंचनेत सापडले आहे.संभाजीनगर येथे राहणाऱ्या मिठारी कुटुंबीयांचा पारंपरिक दूध व्यवसाय आहे. वडिलांचे वय झाल्याने राहुल एकमेव कमावता आहे. हातभार लागावा म्हणून तो खासगी नोकरी करीत होता. सहा महिन्यांपूर्वी येथील नोकरी सुटल्याने तो रिक्षा व्यवसाय करीत होता. दररोज सकाळी रिक्षा काढायची व सायंकाळी सातनंतर ताराबाई रोडवरील भजी-पावच्या गाडीवर कामावर जात असे. त्याच्या अशा दिवस-रात्र कष्टांमुळे घरची परिस्थिती जरा कुठे सुधारत होती.
नेहमीप्रमाणेच मंगळवारी राहुलने सकाळी रिक्षा काढली. रेल्वेस्थानकावर प्रवाशांना सोडून शाहूपुरी येथील वामन गेस्ट हाऊसच्या दारात चहा पिण्यासाठी रिक्षा थांबविली. रिक्षा बंद करून बाहेर पडतो तोवर पाठीमागून जोरात रिक्षाचा बार खांद्यावर आदळला. काही समजण्याच्या आतच तो फरफटत गेला. यावेळी पायाला जोरात मुका मार लागल्याने जिवाच्या आकांताने तो ओरडत होता. पुढे तसाच जोरात फरफटत जाऊन रिक्षामध्ये अडकून पडला. यावेळी त्याला बाहेरचे काहीच दिसत नव्हते. नुसता लोकांचा ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. काय झाले समजत नव्हते. कोणीतरी ‘ड्रायव्हरला बोलवा. गाडीखाली एकजण अडकला आहे,’ असे जोरात ओरडत होते. यावेळी वेदना खूप होत होत्या. कोणीतरी ड्रायव्हरला आणले व कंटेनर मागे घेतल्यानंतर लोकांनी त्याला बाहेर काढून सीपीआरमध्ये उपचारांसाठी आणले. ही घटना सांगताना आजही राहुलच्या मनातील भीती प्रखरपणे जाणवत होती.
राहुलला अपघात झाला आहे, असे वडिलांना कोणीतरी फोन करून सांगताच त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले. ते आपल्या काही नातेवाइकांसोबत ‘सीपीआर’मध्ये आले. राहुलला पाहून ते या ठिकाणी प्रत्येकाला विचारत होते, ‘राहुल ठीक होईल ना?...’ त्यांच्या या प्रश्नाने कुणाला काय बोलावे समजत नव्हते. नातेवाईक व मित्रमंडळींनी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती आता सुधारत असून, कमरेखाली इजा झाल्याने त्याच्यावर बुधवारी सायंकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. राहुलला एक लहान भाऊ आहे, तर आई गृहिणी आहेत.
अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्याच्या बंदीच्या नियमांची अंमलबजावणी प्रशासनाने जर काटेकोरपणे केली असती तर मिठारी कुटुंबीयांवर ही वेळ आज आली नसती, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. बुधवारी रेल्वेचे अधिकारी राहुलची भेट घेऊन गेले असले तरी आर्थिक मदत मिळेलच, हे नक्की सांगता येत नाही.

राहुल घरातील कमावती व्यक्ती
कमरेखाली मोठी दुखापत
बुधवारी खासगी रुग्णालयात झाली शस्त्रक्रिया
रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतली राहुलची भेट; उपचारांसाठी आर्थिक मदत मिळेल काय हा प्रश्नच.

Web Title: Now where was the moment of life, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.