आता पाईपलाईनचे ‘थेट’ दुसऱ्या टप्प्यातील काम होणार
By Admin | Updated: December 15, 2014 23:58 IST2014-12-15T23:34:18+5:302014-12-15T23:58:34+5:30
थेट पाईपलाईन : परवानग्यांचा खोड्यामुळे प्रशासन हतबल

आता पाईपलाईनचे ‘थेट’ दुसऱ्या टप्प्यातील काम होणार
संतोष पाटील -कोल्हापूर -प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘बघ्याची भूमिका’, ‘वन्यजीव’सह शासनाच्या विविध विभागांचा परवानग्यांचा खोडा, सल्लागार कंपनीचा नाकर्तेपणा, नगरसेवकांचा अनुत्साह यामुळे थेट पाईपलाईन योजनेतील पहिला टप्पा मागे ठेवून उर्वरित दोन टप्प्यांतील काम उरकण्याचा निर्णय घेण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे.
सर्वप्रकारच्या सर्वेक्षणासह पाटबंधारे विभागाकडून १.३५ हेक्टर जमिनीचा ताबाही मिळाला आहे. येत्या डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. केंद्राच्या नियमाप्रमाणेच निविदा व कामाची प्रक्रिया व पैसे अदा केले जाणार असल्याने पाईपलाईनबाबत ‘नो टेन्शन’ असे महापालिका प्रशासनाने वेळोवेळी जाहीर केले. नियोजनाप्रमाणे ठेकेदाराने पहिल्या ठप्प्यातील काम बुधवारी १० डिसेंबरला सुरू केले. मात्र, वन्यजीव विभागाची परवानगी नसल्याने पाईपलाईनचे काम पहिल्या दिवशीच थांबले. ‘वन्यजीव’ने फक्त काम रोखण्यापुरतीच कारवाई केल्याने महापालिका प्रशासन बचावले. आता ‘वन्यजीव’च्या परवानगीसाठी किमान एक वर्ष वाट पाहावी लागेल.
जिल्हा परिषद, वनविभाग, पाटबंधारे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जागेसाठी मागणी केली आहे. एकाही विभागाने अद्याप हिरवा कंदील दाखविलेला नाही. मार्गातील झाडांची किंमत ठरविण्यासाठी वनविभागाकडे फीसाठीचे पैसे भरले आहेत. पुईखडी ते चंबुखडी, पुईखडी ते शेंडा पार्क, पुईखडी ते फुलेवाडी या मार्गातील १८ किलोमीटर सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पाण्याची टाकी व जलशुद्धिकरण केंद्राचे हायड्रॉलिक व आरसीसी आराखडा तयार आहे. मात्र, राजकीय पाठबळ कमी पडू लागल्याने पाईपलाईन मार्ग खडतर बनत आहे.
पाईपलाईन मार्गी लावणारच : सतेज पाटील
भूसंपादन व इतर शासकीय परवानग्यांसाठी काळ्म्मावाडी थेट पाईपलाईनच्या कामात खंड पडू देणार नाही. हा कोल्हापूरकरांच्या जिव्हाळाच्या विषय आहे. याप्रश्नी तातडीने लक्ष घालून, महापालिका अधिकारी व पदाधिकारी, इतर अधिकाऱ्यांची सविस्तर आढावा बैठक सोमवारपर्यंत घेण्याची सूचना स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांना दिली आहे. थेट पाईपलाईनसाठी सातत्याने पाठपुरावा करणार, असे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.
‘वन्यजीव’ची परवानगी अनिवार्य आहे. मंजुरीचे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत दीड किलोमीटरचा मार्ग वगळून अन्य दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांतील कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत इतर परवानग्याचे काम सुरू आहे.
- मनीष पवार (जलअभियंता)
सालखर्चमनपाचा हिस्सा (टक्के)
२०१५१००१०
२०१६१४०१४
२०१७१२५१२.५
२०१८६००६