आता एकाच अर्जात निवृत्तिवेतन

By Admin | Updated: August 27, 2015 00:22 IST2015-08-27T00:22:54+5:302015-08-27T00:22:54+5:30

‘निवृत्तिवेतन वाहिनी’ : १ सप्टेंबरपासून लागू होणार आॅनलाईन पद्धत

Now the pension in a single application | आता एकाच अर्जात निवृत्तिवेतन

आता एकाच अर्जात निवृत्तिवेतन

कोल्हापूर : शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होताना कार्यालय प्रमुखांकडून विविध प्रपत्रे भरून घेतली जात होती. यात निवृत्तिवेतन मिळण्यास बराच काळ लागत होता. मात्र, १ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या ‘निवृत्तिवेतन वाहिनी’मुळे ही किचकट प्रक्रिया आता सुलभ होणार असून, जिल्हा परिषदेतून येत्या सहा महिन्यांत निवृत्त होणाऱ्या ४२ जणांना एकच अर्ज भरून या प्रक्रियेचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय ही प्रक्रिया सर्वच शासकीय कार्यालयांना लागू करण्यात आली आहे. शासकीय सेवेतून अथवा स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून, तसेच सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याची विहित नमुन्यातील अनेक प्रकारची कागदपत्रे कार्यालय प्रमुखांकडून व कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांकडून घेतले जात होते. त्यामुळे कर्मचारी निवृत्त होऊन वर्ष झाले तरी त्याला निवृत्तिवेतन लागू होत नव्हते. मात्र, राज्य शासनाने यात सुधारणा करीत एकाच प्रकारचा अर्ज, तोही आॅनलाईन पद्धतीने भरून दिल्यानंतर, ज्या दिवसापासून कर्मचारी निवृत्त होणार, त्या दिवसापासून त्याला निवृत्तिवेतन लागू होणार आहे. याचा लाभ जिल्हा परिषदेतील ४२ कर्मचाऱ्यांना होणार आहे, हे सर्व कर्मचारी येत्या सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने निवृत्त होणार आहेत. जिल्हा परिषदेचा विचार करता, यापूर्वीच्या ‘परिभाषित निवृत्तिवेतन’मध्ये त्रुटी असल्याने अनेकांना निवृत्तिवेतन मिळताना अडचणी येत होत्या. १ सप्टेंबरनंतर निवृृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर तत्काळ निवृत्तिवेतन मिळणार आहे. सध्या जिल्हा परिषदेकडे १० हजार ४०५ निवृत्तिवेतनधारक आहेत. त्यांच्यावर २०१४-१५ या सालापर्यंत १६० कोटी ५९ लाख ५३ हजार ३२१ रुपये इतका पेन्शनपोटी खर्च केला आहे; तर २०१५-१६ या चालू काळात ७३ लाख रुपये खर्च केले आहेत. १ सप्टेंबर २०१५ नंतर ४२ कर्मचारी निवृत्त होणार आहेत. मागील प्रणालीमधील दोन प्रकरणे कागदपत्रांच्या त्रुटीमुळे प्रलंबित आहेत. ( प्रतिनिधी )
येत्या आठ दिवसांत प्रलंबित दोन प्रकरणांची निर्गत करू. याशिवाय १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘निवृत्तिवेतन वाहिनी’मुळे येथून पुढे होणाऱ्या निवृत्तिवेतनधारकांना एकच अर्ज, तोही आॅनलाईन भरल्यानंतर त्या कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या दिवसापासून त्याला निवृत्तिवेतनाचा लाभ मिळणार आहे.
- गणेश देशपांडे, मुख्य वित्त, लेखाधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर

निवृत्त होणारे ४२ जण शिक्षकच
१ सप्टेंबर २०१५ ते फेबु्रवारी २०१६ अखेर जिल्हा परिषदेकडील ४२ शिक्षक टप्प्याटप्याने निवृत्त होणार आहेत. निवृत्त होणाऱ्यांमध्ये २१ मुख्याध्यापक, १५ अध्यापक, ४ केंद्रप्रमुख आणि २ पदवीधर अध्यापकांचा समावेश आहे.

Web Title: Now the pension in a single application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.