पंचगंगा स्मशानभूमीसाठी आता गॅसदाहिनी

By Admin | Updated: July 6, 2016 01:08 IST2016-07-06T01:04:36+5:302016-07-06T01:08:14+5:30

महासभेसमोर मंजुरीकरिता प्रस्ताव : शेडवरील पत्रे तातडीने बदलणार : पाटणकर

Now for the Panchaganga crematorium, | पंचगंगा स्मशानभूमीसाठी आता गॅसदाहिनी

पंचगंगा स्मशानभूमीसाठी आता गॅसदाहिनी

कोल्हापूर : पर्यावरणाचे होणारे प्रदूषण तसेच नागरिकांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन पंचगंगा स्मशानभूमीसाठी गॅसदाहिनी घेण्याचा प्रस्ताव असून तो महासभेसमोर मंजुरीकरिता ठेवण्यात येईल, अशी ग्वाही महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी मंगळवारी दिली.
स्मशानभूमीत बांधण्यात आलेल्या शेडवरील पत्रेही तातडीने बदलले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महानगरपालिकेच्या सभागृहातील ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, ताराराणी मार्केट कार्यालयाचे सभापती राजसिंह शेळके, नगरसेवक शेखर कुसाळे, कमलाकर भोपळे, किरण नकाते, आदींनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना सोबत घेऊन पंचगंगा स्मशानभूमीची पाहणी केली. यावेळच्या चर्चेनंतर पाटणकर यांनी ही ग्वाही दिली.
स्मशानभूमीत सध्या ४२ बेड असून दोन-तीन दिवस रक्षाविसर्जन होऊ शकले नाही तर मृतदेहांचे दहन करण्यात अडचणी येतात. त्याला पर्याय म्हणून गॅसदाहिनीचा प्रस्ताव तयार करावा आणि तो महासभेसमोर मांडावा, असा विषय समोर आला. जर गॅसदाहिनी बसविली तर मृतदेह दहन करण्यासाठी आता येणारा १५०० रुपयांचा खर्च ७०० रुपयांवर येईल, पर्यावरणाचे प्रदूषण टळले जाईल आणि नागरिकांचीही गैरसोय होणार नाही, असे सत्यजित कदम म्हणाले.
स्मशानभूमीतील शेडचे पत्रे खराब झाले असल्याने पावसाचे पाणी गळत आहे. स्मशानभूमीतील देखभाल-दुरुस्तीसाठी नऊ लाख रुपयांचा निधी असून, त्यातून तातडीने हे काम सुरू केले जाईल. त्याकरिता ५ (२) २ खाली निविदा काढल्या जातील, असे पाटणकर यांनी सांगितले. शेडमधील लाईट फिटिंगचे काम तातडीने सुरू करण्याची सूचना यावेळी दिली. स्मशानभूमीतील गैरसोयी तातडीने दुरुस्त करण्याबाबत लेखी पत्र विरोधी पक्षनेता संभाजी जाधव, गटनेता सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना दिले. (प्रतिनिधी)


गैरसोयी दूर न केल्यास धरणे आंदोलनाचा इशारा
स्मशानभूमीतील गैरसोयी येत्या पंधरा दिवसांत दूर केल्या नाहीत तर महानगरपालिका चौकात धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक भूपाल शेटे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे दिला आहे. विजेची पुरेशी सोय, कॉँक्रीट पॅसेज, पिण्याचे पाणी, आदी सुविधा तातडीने पुरवाव्यात, असे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Now for the Panchaganga crematorium,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.