आता कायदेशीर मार्गाने आंदोलन
By Admin | Updated: November 8, 2016 01:25 IST2016-11-08T01:26:52+5:302016-11-08T01:25:59+5:30
सकल ऊस परिषदेचा निर्णय : आजपासून कारखाने होणार सुरू

आता कायदेशीर मार्गाने आंदोलन
जयसिंगपूर : चालू गळीत हंगामात ३३०० रुपये फायनल बिल मिळावे, एफआरपीसह १७५ रुपये विनाकपात ऊस उत्पादकांना १५ दिवसांत द्यावेत, जे कारखानदार एकरकमी बिल देणार नाहीत, त्या कारखान्यांविरोधात कायदेशीर व सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय ऊस सकल परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी घेतला. यामुळे शिरोळ-हातकणंगले तालुक्यातील कारखाने आज, मंगळवारपासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.
शनिवारी (दि. ५) शिरोळ येथे पहिली सकल ऊस उत्पादक परिषद झाली. या परिषदेत ११ विविध ठराव करण्यात आले. सोमवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर येथील घरासमोर ठिय्या आंदोलनासाठी शिरोळ तालुक्यातून कार्यकर्ते गेले होते. इस्लामपूर येथील आंदोलनानंतर सकल ऊस उत्पादक परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली. एफआरपी अधिक १७५ रुपये १५ दिवसांत ऊस उत्पादकांना मिळावेत, ३३०० रुपये फायनल बिल मिळावे, मागील हंगामातील २०० रुपये कारखानदारांनी द्यावेत, अशी भूमिका घेत जे कारखाने एकरकमी एफआरपी अधिक १७५ रुपये देणार नाहीत, त्या कारखान्यांविरोधात कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दादासाहेब काळे यांनी दिली.