...आता लक्ष जयसिंगपूर ऊस परिषदेकडे

By Admin | Updated: October 18, 2015 23:37 IST2015-10-18T23:27:56+5:302015-10-18T23:37:54+5:30

‘एफआरपी’बाबत कोण ‘भारी’ ठरणार : शासन कोणती भूमिका घेणार

... now focus on Jaysingpur Ush Parishad | ...आता लक्ष जयसिंगपूर ऊस परिषदेकडे

...आता लक्ष जयसिंगपूर ऊस परिषदेकडे

संदीप बावचे - जयसिंगपूर -यंदाच्या वर्षी एकरकमी ‘एफआरपी’ मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कोल्हापूर येथे साखर सहसंचालक कार्यालयावर विराट मोर्चा काढून ‘स्वाभिमानी’ने रणशिंग फुंकले आहे. तर ६ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेमध्ये खा. राजू शेट्टी आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहेत. गेल्या ऊस परिषदेत सावध भूमिका घेऊन जादा दिवसाचा सरकारला एल्टीमेटम दिला होता. यावर्षी एकरकमी एफआरपीबाबत कोणती भूमिका घेऊन आंदोलनाची दिशा ठरणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.ऊस उत्पादन खर्च व दर याचा ताळमेळ बसत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम तीन टप्प्यांत देण्याच्या भूमिकेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपीचा हाच धागा पकडून एकरकमी एफआरपी हवी यावर जोर धरला आहे. ठिकठिकाणी शेतकरी मेळावे घेऊन जनजागृती केली, सह्यांची मोहीम राबवून १६ आॅक्टोबरला कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयावर विराट मोर्चा काढला. एकरकमी एफआरपीच्या मुद्यावरून ‘स्वाभिमानी’ आक्रमक झाली असून, ‘एफआरपी’प्रश्नी प्रसंगी न्यायालयात जाण्याचाही पवित्रा ‘स्वाभिमानी’ने घेतला आहे.
कोल्हापूर येथे काढलेल्या मोर्चात खा. राजू शेट्टी यांनी यावर्षी दुष्काळ असल्यामुळे साखरेचे उत्पादनही कमी होणार आहे. ३ हजाराच्यावर साखरेचे दर होतील, त्यामुळे सरकारला एकरकमी एफआरपी देण्यास अडचण येणार नाही. मात्र, साखर कारखान्यांनी टप्प्याटप्प्याने एफआरपी देण्याचे जाहीर केले आहे. त्यांचा हा डाव मोडून काढून एकरकमी रक्कम घेऊ, असे ‘स्वाभिमानी’ने शासनाला खडसावले आहे.
६ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे ऊस परिषदेची घोषणा खा. शेट्टी यांनी केली आहे. ऊस परिषद ऐतिहासिक होण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत शासन कोणती भूमिका घेते याकडे स्वाभिमानीचे लक्ष असून, शासनाने कारखानदारांची बाजू घेतली तर शासनाच्या विरोधात आरपारची लढाई करण्याची तयारीही ‘स्वाभिमानी’ची असल्यामुळे ऊस परिषदेकडे कारखानदार, शासन व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत
एकवेळी खासदार शेट्टींच्या खांद्याला खादा लावून काम करणारे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनीही एकरकमी एफआरपीबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. प्रसंगी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनाही रस्त्यावर उतरणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खा. शेट्टी व आ. पाटील दोघेही ऊस दराचा प्रश्न उचलून धरत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीची आशा निर्माण झाली आहे.


यशस्वी कोण ठरणार
तीन टप्प्यांतील एफआरपीबाबत शासनाने कोणतीही भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. ‘स्वाभिमानी’ने एकरकमी एफआरपीचा मुद्दा उचलून धरला आहे, तर कारखानदारांनी टप्प्याटप्प्याने एफआरपी देण्याची भूमिका घेतली आहे. एफआरपीच्या मुद्यावरून शासन, संघटना की कारखानदार यशस्वी होणार हा देखील कळीचा मुद्दा आहे.

पहिली उचल मागे पडली
प्रत्येक वर्षी ऊस परिषदेमध्ये पहिली उचल मागायची आणि आंदोलन अंती तोडगा काढून दर निश्चित केला जात असे. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच पहिल्या उचलीचा मुद्दा मागे पडला असून, एफआरपी एकरकमी द्या, अशी मागणी ‘स्वाभिमानी’ने सुरुवातीपासूनच केल्यामुळे ऊस परिषदेतील एकरकमी एफआरपीचा मुद्दा केंद्रस्थानी ठरणार आहे.

Web Title: ... now focus on Jaysingpur Ush Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.