आता, फस्ट प्रेफरन्स ‘शिवाजी विद्यापीठ’
By Admin | Updated: December 14, 2014 23:43 IST2014-12-14T23:29:50+5:302014-12-14T23:43:18+5:30
गुणवत्तेच्या जोरावर गाठले उच्च स्थान : नॅकच्या ‘अ’ मानांकनाने वाढविला लौकीक; नोकरीसाठी दिली जाणारी बगल होणार दूर

आता, फस्ट प्रेफरन्स ‘शिवाजी विद्यापीठ’
कोल्हापूर : संतोष मिठारी --‘ग्रामीण चेहरा असलेले विद्यापीठ’, नोकरीसाठी मुलाखतीदरम्यान विद्यापीठाचे नाव घेताच काहीसे वेगळ्या नजरेने पाहण्याचा विद्यार्थ्यांना आलेले अनुभव, केली जाणारी कुचेष्टा, या विद्यापीठाची पदवी असेल, तर नोकरी देताना दिली जाणारी बगल अशा गैरसमजांना शिवाजी विद्यापीठाने कोसो दूर लोटले आहे. गुणवत्तेच्या जोरावर मुंबई, पुणे आदी विद्यापीठांना मागे टाकत राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेचे (नॅक) ‘अ’मानांकन पटकावून कोल्हापूरचे हे विद्यापीठ देशात ‘रोल मॉडेल’ बनले आहे. खुद्द ‘नॅक’च देशातील अन्य विद्यापीठांना मूल्यांकनाच्या तयारीबाबत शिवाजी विद्यापीठाचे उदाहरण देत आहे.
कोल्हापूर ते सोलापूरपर्यंतच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची सोय शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध झाली. स्थापनेपासूनच या विद्यापीठाला सातत्याने मुंबई, पुणे आदींशी सातत्याने गुणवत्तेबाबत स्पर्धा करावी लागली. अशा स्थितीत देखील बदलत्या काळाची गरज ओळखून अभ्यासक्रमांची पुनर्ररचना, अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर, शैक्षणिक प्रणाली, भक्कम प्रशासकीय कामकाज, संशोधनात वेगळेपण आदींच्या माध्यमातून विद्यापीठाने ‘सुवर्णमहोत्सवी’ वाटचाल केली.
२००४ मध्ये ‘नॅक’कडून ‘बी प्लस’ मानांकन मिळाले. त्यानंतर २००८ मध्ये त्यात घसरण होऊन मानांकन ‘बी’ झाले. त्यानंतर २०१४ मध्ये ‘अ’ मानांकन मिळवायचे या ध्येयाने विद्यापीठातील प्रत्येक घटकाने तयारी केली तसेच नवीन अभ्यासक्रम, अंतर्गत सुविधा, अध्यायन-अध्यापन व मूल्यमापन आदी मुद्द्यांवर सरस कामगिरी करत राज्यात ३.१६ इतक्या सर्वाधिक गुणांकनासह ‘अ’ मानांकन पटकाविले.
विद्यापीठाने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामगिरीची ‘नॅक’ ने प्रशंसा केली. ‘नॅक’ अन्य विद्यापीठांना मूल्यांकनाच्या तयारीबाबत शिवाजी विद्यापीठाचे उदाहरण देत आहे. विद्यापीठाने केलेले ग्रीन, एनर्जी आॅडिट अशा महत्त्वाच्या अहवालांच्या दोन प्रती ‘नॅक’ने घेतल्या असून त्या आपल्या प्रदर्शनात ठेवल्या आहेत. मूल्यांकनाच्या तयारीबाबत मुुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, वर्धा केंद्रीय विद्यापीठाने संपर्क साधला आहे. शिवाय अधिकाऱ्यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले जात आहे.
ॅनिर्विवाद आघाडी
‘नॅक’कडून झालेल्या गुणांकनात शिवाजी विद्यापीठ अव्वल आहे. विद्यापीठाला ३.१६ गुण मिळाले आहेत. त्यापाठोपाठ ३.१४ गुणांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद) आहे. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (३.०८), मुंबई विद्यापीठ (३.०५) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (३.०१) आहे.
विद्यापीठाला ‘अ’ मानांकन मिळाल्याने जबाबदारी वाढली आहे. ‘नॅक’ने केलेल्या सूचनांची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत. त्याची सुरुवात युनिव्हर्सिटी पोटेन्शियल एक्सलन्स योजनेतील सहभागातून होईल. येत्या शैक्षणिक वर्षात संबंधित योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याची तयारी आजपासून सुरू केली आहे. त्यासाठी उपसमित्या नेमून महिन्याभरात त्याचा प्रस्ताव तयार केला जाईल.
- डॉ. व्ही. बी. जुगळे , संचालक, अंतर्गत गुणवत्ता कक्ष
शिवाजी विद्यापीठाने मुंबई, पुण्यात असलेला शैक्षणिक गुणवत्तेचा केंद्रबिंदू कोल्हापूरपर्यंत वाढविला आहे. गुणवत्तेच्या स्पर्धेत आम्ही देखील उतरलो आहोत. सुवर्णमहोत्सवी वर्षातील पर्दापणापासून ‘लोकल टू ग्लोबल’ असे ध्येय घेऊन काम सुरू केले. पहिल्या टप्प्यावर नॅकचे ‘अ’ मानांकन मिळाले. आता ‘ग्लोबल’ झेप घेण्याच्यादृष्टीने विद्यापीठाची तयारी सुरू आहे.
- डॉ. एन. जे. पवार, कुलगुरू
कौशल्यवृद्धी करणारे शिक्षण देण्याची ‘नॅक’ची सूचना
नवीन अभ्यासक्रम, अंतर्गत सुविधा, अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन आदींची प्रशंसा करीत राष्ट्रीय मूल्यांकन परिषदे (नॅक)ने शिवाजी विद्यापीठाला ‘अ’ (ए) मानांकन दिले. पण, याबरोबरच निव्वळ पुस्तकी नको, तर कौशल्यवृद्धी करणारे व्यावसायिक शिक्षण द्या, विभाग पातळीवर संयुक्त संशोधनाला महत्त्व द्या, विद्यार्थी सुविधा अद्ययावत करा, आदी सूचना करत पुढील वाटचालीची दिशाही विद्यापीठाला दिली आहे.
‘नॅक’च्या दुसऱ्या फेरीत सुचविलेल्या सूचना, केलेल्या शिफारशी यांची पूर्तता करून विद्यापीठाने तिसऱ्या फेरीची तयारी केली. त्यात नवीन अभ्यासक्रम, अंतर्गत सुविधा, अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन पद्धती, विद्यार्थी सुविधा बदलत्या परिस्थितीचा वेध घेऊन अद्ययावत केल्या. त्यामुळे ‘अ’ मानांकन मिळाले.
विद्यापीठाने राबविलेले उपक्रम व केलेल्या तयारीमुळे ‘नॅक’ प्रभावित झाले. मूल्यांकनाच्या अहवालात त्यांनी मोजक्याच सूचना विद्यापीठाला केल्या आहेत.
त्यात विद्यापीठाने विविध विद्याशाखांच्या विभागांतर्गत संयुक्त संशोधनाला प्राधान्य द्यावे, विभागांनी सामंजस्य करारांसाठी प्रयत्न करावेत, रोजगारनिर्मितीसाठी अभ्यासक्रमांमध्ये सुधारणा करावी, त्यासाठी देश-राज्य पातळीवरील सीआयआय, फिकी, नॅशडॅक, अॅसोकॅम, आदी उद्योजकीय संघटना, संस्थांशी चर्चा करून त्यांना लागणारा ‘वर्कफोर्स’ लक्षात घ्यावा. त्यातून निव्वळ पुस्तकी नको, तर कौशल्यवृद्धी करणारे, रोजगारनिर्मिती करणारे शिक्षण द्यावे, असे सुचविले आहे.
विद्यापीठ, महाविद्यालयांतील अंध विद्यार्थी, शहरातील नागरिक यांच्यासाठी विद्यापीठाच्या ग्रंथालयात अद्ययावत ‘ब्रेल लायब्ररी’ सुरू करावी. विद्यार्थी सुविधा अद्ययावत कराव्यात. अधिविभाग हे स्वत:पुरते मर्यादित राहू नयेत. एकत्रितपणे संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचना ’नॅक’ ने केल्या आहेत.