पेठवडगाववर आता ‘तिसऱ्या डोेळ्या’ची नजर
By Admin | Updated: April 8, 2015 00:30 IST2015-04-07T22:58:18+5:302015-04-08T00:30:31+5:30
१६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे : पोलीस व नागरिकांच्या सहभागातून उपक्रम

पेठवडगाववर आता ‘तिसऱ्या डोेळ्या’ची नजर
सुहास जाधव- पेठवडगाव
वाढत्या चोरीचे प्रमाण, गुंडगिरीला पायबंद बसावा, तसेच सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस व नागरिकांच्या सहभागातून शहरावर सीसीटीव्ही वॉचची संकल्पना अमलात आली आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. याची सर्व सूत्रे पोलिसांकडेच आहेत. आता वडगाव शहरावर तसेच परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांसह सीसी कॅमेऱ्याचे लक्ष राहणार आहे.वडगाव हे राष्ट्रीय महामार्गालगतचे व मोठी बाजारपेठ, आठवडी बाजार असणारे जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण आहे. शहरात शैक्षणिक सोयी असल्याने अनेकांची ये-जा असते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेबरोबरच पाकीटमार, मोबाईल चोर, चेनस्नॅचर आदींसह अवैध व्यावसायिकांवर लक्ष ठेवणे आवश्यक होते. अलीकडे वडगाव शहराचा वाढता विस्तार आणि चोऱ्यांचे वाढते प्रकार पाहता वडगाव हे संवेदनशील बनले आहे.
याबाबत तत्कालीन पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी लोकसहभागातून सीसीटीव्हीतून लक्ष ठेवण्याचा संकल्प केला. राज्यातील पहिलाच लोकसहभागातून प्रकल्प वडगावमध्ये राबविला. शहरातील सराफ, कापड, धान्य, किराणा व्यापारी, बांधकाम व्यवसायिक, पोलीस, पत्रकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी या उपक्रमासाठी मदत केली.
नवी मुंबई वाशी येथील झेड प्लस सेक्युरिटी सिस्टम कंपनीचे मनोज व राजा आरोरा यांच्यावतीने वडगाव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी १६ कॅमेरे बसविण्यात आले.
पालिका चौकात ३६० अंशात फिरणारा पीएपी कोरीयन आयपी कॅमेरा बसविण्यात आला आहे. या कॅमेऱ्यामध्ये सुमारे एक किलोमीटर अंतराचे चित्र स्पष्ट दिसते. पालिका चौकातून बिरदेव चौक व सिद्धार्थनगरातील हौदापर्यंतचे स्पष्ट दिसते. तर वारणा बाजार चौक, बिरदेव चौक, वाणी पेठ, झेंडा चौक येथे पंधरा कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
या सर्व कॅमेऱ्याचे छायाचित्रण प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांच्या कक्षात व इंटरनेटवर पाहू शकतो. या कॅमेऱ्याची देखभाल दुरुस्ती दोन वर्षांसाठी आहे. शिवाजी चौक, सरसेनापती चौक, वाठार चौकासह वाठार महामार्गावर कॅमेरे बसविण्याचे प्रस्तावित आहे. यातून मिळणारा डाटा सहा महिन्यांपर्यंत साठविण्याची सोय असून कायमस्वरुपासाठी प्रत्येक महिन्याला डाटा साठवून ठेवण्यात येणार आहे.
शहरात ज्या भुरट्या चोऱ्या होतात, त्यावर सीसीटीव्हीचे लक्ष राहील तसेच कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची दक्षता घेता येईल. महिला छेडछाडप्रकरणी तत्काळ प्रतिबंध करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत मिळणार आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी ‘तिसरा डोळा’ सक्षमपणे व निपक्षपातीपणे काम करेल. कॅमेरे बसविल्यापासून पाकीटमार, मोबाईल चोरीची एकही घटना आठवडी बाजारात घडली नाही. कायदा व सुव्यवस्थेस त्याचा मोठा हातभार लागेल. - औदुंबर पाटील, पोलीस निरीक्षक