आता केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST2021-05-28T04:18:26+5:302021-05-28T04:18:26+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांनाही जून महिन्यात सवलतीच्या दरात रास्त भाव धान्य दुकानातून धान्य मिळणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ...

आता केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत धान्य
कोल्हापूर : जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांनाही जून महिन्यात सवलतीच्या दरात रास्त भाव धान्य दुकानातून धान्य मिळणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ११ लाख लोकांना होणार आहे. हे धान्य मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्या नागरिकांना प्राधान्य या पद्धतीने त्याचे वाटप होणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट नसलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात सवलतीच्या दरात अन्नधान्य देण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. याचा अध्यादेश मंगळवारी प्रसिद्ध झाला आहे. गेल्यावर्षी केशरी कार्डधारकांना मे ते ऑगस्ट २०२० या चार महिन्यांच्या कालावधीत प्रतिव्यक्ती ३ किलो गहू (८ रुपये किलो) व २ किलो तांदूळ (१२ रुपये किलो) याप्रमाणे ५ किलो धान्य देण्यात आले होते. या योजनेअंतर्गत धान्याचे वितरण करूनदेखील मोठ्या प्रमाणात धान्य शिल्लक राहिले आहे. त्यामुळे त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी शासनाकडे या धान्याचे वितरण करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली होती. त्यानुसार शासनाने हा अध्यादेश काढला आहे. हे धान्य मर्यादित प्रमाणात असल्याने जे कार्डधारक आधी येतील त्यांना त्याचे वितरण केले जाईल.
--
जिल्ह्यात ५२६ टन धान्य शिल्लक
या योजनेअंतर्गत गेल्यावर्षी धान्याचे वितरण केल्यानंतरदेखील जिल्हयात २१२.२२० टन तांदूळ व ३१४.६८० टन गहू शिल्लक राहिले आहे. हे धान्य आता माणशी एक किलो याप्रमाणे सवलतीच्या दरात केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे. गेल्यावर्षी या योजनेला शहरातून खूप कमी प्रतिसाद मिळाला होता, यंदादेखील शहरातून धान्य खरेदी झाली नाही तर ग्रामीण भागात त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
---
काय मिळणार
१ किलो गहू (८ रुपये किलो)
१ किलो तांदूळ (१२ रुपये किलो)
--
केशरीच्या कुटुंबांना मिळणार लाभ
जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकाधारकांची २ लाख ७९ हजार ४२६ इतकी आहे. या योजनेचा लाभ या शिधापत्रिकांवरील ११ लाख ११ हजार ०६४ इतक्या लोकांना मिळणार आहे.
---
बीपीएलच्या साडेपाच लाख कुटुंबांना लाभ
कोरोना व लॉकडाऊनमुळे राज्य शासनाने मे महिन्याचे व केंद्र शासनाने मे व जून अशा दोन महिन्यांचे धान्य मोफत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप सुरू असून त्याचा लाभ जिल्ह्यातील ५ लाख ६५ हजार २३८ कुटुंबांना झाला आहे.
--
जिल्ह्यातील एकूण कार्डधारक
बीपीएल : ५३ हजार २२१
अंत्योदय : ५ लाख १२ हजार ०१७
केशरी : २ लाख ७९ हजार ४२६
---
गेल्यावर्षी जाहीर झालेल्या या योजनेअंतर्गत गहू व तांदूळ शिल्लक राहिले होते. अनेकजणांनी धान्य नेले नाही, त्यामुळे या उरलेल्या धान्याचे वितरण करण्याची परवानगी आम्ही मागितली होती. या धान्याचा साठा तुलनेने कमी असल्याने प्रथम येणाऱ्या केशरी शिधापत्रिकाधारक नागरिकांना त्याचे वितरण केले जाईल.
दत्तात्रय कवितके (जिल्हा पुरवठा अधिकारी)
--
फोटो नं २८०५२०२१-कोल-रेशन गर्दी
ओळ : कोल्हापुरातील रेशन दुकानांसमोर धान्य नेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. (छाया : नसीर अत्तार)
--