आता आषाढातही शुभमंगल सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:44+5:302021-07-18T04:18:44+5:30
कोल्हापूर : कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्य जनजीवनच नव्हे तर विवाह सोहळ्यांच्या कालावधीवरदेखील परिणाम झाला आहे. एरवी चातुर्मासात विवाह ...

आता आषाढातही शुभमंगल सावधान
कोल्हापूर : कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्य जनजीवनच नव्हे तर विवाह सोहळ्यांच्या कालावधीवरदेखील परिणाम झाला आहे. एरवी चातुर्मासात विवाह सोहळे केले जात नाही, मात्र यंदा आषाढ महिन्यादेखील लग्नसमारंभ होत आहेत. विवाह मुहूर्त नसतानादेखील ज्या मुहूर्तांवर विवाह केले जातात त्याला गौण काळातील विवाह मुहूर्त म्हणतात. सध्या याच मुहूर्तांवर लग्नाचा धुमधडाका सुरू आहे.
जानेवारी ते एप्रिल या काळात गुरू व शुक्राचा अस्त असतो तर जुलै ते नोव्हेंबरमध्ये चातुर्मास सुरू असतो. या चातुर्मासात देवशयनी म्हणजे देवांचा विश्रांती काळ असतो. त्यामुळे या चार महिन्यांमध्ये व्रतवैकल्ये, देवादिकांची उपासना केली जाते. त्यामुळे या काळात विवाह सोहळे होत नाहीत. मात्र गेल्यावर्षीपासून सुरू झालेल्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे समारंभांच्या धार्मिक संकेतांना मुरड घालून हे कार्यक्रम आटोपले जात आहेत. त्याला विवाह सोहळेदेखील अपवाद राहिलेले नाहीत. लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षीपासून ज्या विवाहांच्या तारखा पुढे पुढे ढकलण्यात आले आहेत, ते सोहळेदेखील सध्याच्या आषाढात धुमधडाक्यात होत आहेत. त्यामुळे कोल्हापुरात अनेक घरांच्या दारात मांडव घातलेले दिसत आहेत.
--
आषाढातील विवाह तारखा
१८, २२, २५, २६, २८, २९ जुलै. ३, ४ ऑगस्ट.
--
पार्किंग, रिकामी जागा, मंगल कार्यालये
लग्न समारंभ कमीत कमी माणसांमध्ये करायचे असल्याने अनेक जणांनी मंगल कार्यांलयांऐवजी आपल्याच इमारतीखालचे पार्किंग, शेजारचा रिकामा प्लॉट, घर मोठे असेल तर घरात किंवा दारातच विवाह समारंभ करत आहेत. याशिवाय मंगल कार्यालयांचेही बुकिंग केले जात आहे, कार्यालयांमध्ये कार्यक्रम करताना शासकीय नियमांची काळजी घ्यावी लागते. मात्र या कोरोनामुळे गुरुजींपासून बँडवाले, घोडेवाले, डोलीवाले, तुतारीवाले, इव्हेंट मॅनेजमेंटमधील लोक असे सगळेच नागरिक अडचणीत आले आहेत.
---
परवानगी २५ चीच पण...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विवाह समारंभासाठी २५ लोकांनाच परवानगी दिली आहे. आणि वेळ दिली आहे २ तास. प्रत्यक्षात मात्र एवढ्या कमी माणसात आणि एवढ्या कमी कालावधीत विवाह सोहळा होत नाही. २५ च्या ठिकाणी ५०-१०० पाहुणे मंडळी उपस्थित असतात. ग्रामीण भागात, उपनगरांमध्ये लोकप्रतिनिधी किंवा महत्त्वाच्या व्यक्तीच्या कुटुंबातील कुणाचा विवाह असेल तर ही संख्या पार ३०० च्या पुढे जात आहे. महापालिका क्षेत्रात हे दिसून आले तर दंडात्मक कारवाई होते, काहीवेळा होतही नाही.
----
चातुर्मास हा देवतांच्या अनुष्ठानाचा काळ असतो. त्यामुळे पूर्वी या कालावधीत विवाह सोहळे होत नव्हते, त्यामागे व्यावहारिक कारण हेदेखील होते की, पावसाळा असतो, पाहुण्यांना प्रवासात अडचणी येतात. नदीला पूर येणे, रस्ते बंद होते असे प्रकार होतात. त्यामुळेही या काळात पूर्वी लग्न टाळले जायचे, आता शास्त्राचा आधार घेऊन मधला मार्ग काढला जातो.
वेदमूर्ती सुहास जोशी
--
पूर्वीच्या पद्धती वेगळ्या होत्या. आता चैत्रापासून आषाढापर्यंत लग्ने लावली जातात. त्याला काही हरकत नसते. श्रावण, भाद्रपद, अश्विनी या महिन्यांमध्ये विवाह होत नाहीत. कार्तिकमध्ये मग तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्त असतात.
आदिनाथ सांगळे (गुरुजी)
----