आता करो या मरो आंदोलन
By Admin | Updated: February 8, 2015 00:50 IST2015-02-08T00:33:28+5:302015-02-08T00:50:27+5:30
‘एव्हीएच‘ प्रश्न : लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार : संध्यादेवी कुपेकर; हरीत लवादाकडे दाद मागणार

आता करो या मरो आंदोलन
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील ‘एव्हीएच’ प्रकल्पाने विरोध डावलून उत्पादन सुरू केले आहे. त्या विरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. भविष्यात प्रकल्प हद्दपार होईपर्यंत ‘करो या मरो’ असे आंदोलन हाती घेणार आहे. या प्रश्नासंंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार आहे, अशी माहिती चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
कुपेकर म्हणाल्या, नव्या शासनाने प्रकल्पातील उत्पादनाला परवाना दिली आहे. त्याच्या विरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे. प्रतिकात्मक राजीनामेही दिले. भविष्यात वेळ पडल्यास या प्रश्नासाठी आम्ही खरोखर राजीनामाही देवू. मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक बोलावून एव्हीएचसंंबंधी आमच्या भावना समजावून घ्याव्यात, अशी मागणी आहे. एव्हीएच विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली पक्षविरहित आंदोलन सुरू आहे.
त्यामुळे यापुढील काळातील आंदोलनात सर्व पक्ष, वकील, डॉक्टर, विद्यार्थी, आदी संघटनाही सहभागी व्हावेत.
आंदोलनाच्या नेत्या डॉ. नंदा बाबूळकर म्हणाल्या, एव्हीएच प्रकल्पामुळे निसर्गावर विपरित परिणाम होणार आहे. शेती नापीक होणार आहे. मानवी जीवनावर गंभीर परिणाम होणार आहेत. त्यामुळे प्रकल्पाला कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड या राज्यांनी परवानगी नाकारली. जिंदाल उद्योग समूहाची कर्नाटकातील बळ्ळारीला हजारो एकर जमीन असताना चंदगड तालुक्यातील हलकर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये एव्हीएच प्रकल्प सुरू करण्यामागचे षड्यंत्र काय? सुरुवातीला स्टीलचा प्रकल्प असणार म्हणून तत्कालीन लोकप्रतिनिधींनी विरोध केला नाही.
कस्तुरीरंगन अहवालातील संवेदनशील २१ गावांपैकी किट्टवडे गाव प्रकल्प स्थळापासून केवळ एक किलोमीटर हवाई अंतरावर आहे. कर्नाटकातील बळ्ळारी जिल्ह्यातून तोरंगल्लू येथून ३१८ किलोमीटरवरून येणार आहे. तयार माल निर्यातीसाठी जयगड बंदरापर्यंत नेण्यात येणार आहे. कंपनीने प्रदूषण नियंत्रण मंडळासह अन्य विभागाला खोटी, बनावट, दिशाभूल करणारी माहिती देवून परवाना घेतला. वस्तुस्थिती लपविलेली आहे.