राज्य संघ निवडीसाठी आता विभागवार स्पर्धा--गोलचाही दुष्काळ
By Admin | Updated: December 10, 2014 00:15 IST2014-12-10T00:13:05+5:302014-12-10T00:15:17+5:30
व्हॉलिबॉल अजिंक्यपद : संयोजकांचा ताण होणार हलका--\ केएसए फुटबॉल लीग : दोन्ही सामने गोलशून्य बरोबरीत

राज्य संघ निवडीसाठी आता विभागवार स्पर्धा--गोलचाही दुष्काळ
कुरुंदवाड : येथे राज्य व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धा होत आहेत. स्पर्धेच्या आयोजनासाठी येणारा मोठा आर्थिक खर्च, खेळाडूंच्या निवासाची भेडसावणारी समस्या, या कारणामुळे राज्य व्हॉलिबॉल असोसिएशन या स्पर्धा विभागवार घेण्याच्या विचारात आहे. त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्याला मिळणाऱ्या प्रतिनिधित्वाची कुरूंदवाडची स्पर्धा अखेरचीच ठरणार आहे. या स्पर्धेची सर्व तयारी झाली असून सायंकाळी ६ वाजता उद्घाटन होणार आहे.
४६ वी महाराष्ट्र व्हॉलिबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धा बुधवार (दि. १०) पासून कुरुंदवाडमध्ये सुरू होत आहे. या स्पर्धेतून अखिल भारतीय व्हॉलिबॉल स्पर्धेतील महाराष्ट्राचा संघ निवडला जातो. त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व असते. या स्पर्धेत प्रत्येक राज्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील महिला व पुरुष असे दोन संघ प्रतिनिधित्व करतात. ३८ जिल्ह्यांतील ७६ संघ सहभागी होत असल्याने सुमारे १०० खेळाडू, स्पर्धेचे पंच, प्रशिक्षक, निवड समिती पदाधिकारी अशा १२०० जणांच्या निवासाची सोय महत्त्वाची असते. तसेच सुसज्ज मैदान, प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था, वाहतूक, सुरक्षा, भोजन व्यवस्था यासाठी मोठ्या आर्थिक खर्चाची तजवीज संयोजकांना करावी लागते. मात्र, अनेक जिल्ह्यात ही व्यवस्था तोकडी पडत असल्याने गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धा राज्य व्हॉलिबॉल संघाचे अध्यक्ष विजय डांगरे यांना आपल्या जिल्ह्यातच, नागपूर येथेच घ्याव्या लागत आहेत.
संयोजकांना भेडसावणाऱ्या समस्यांमुळे राज्य व्हॉलिबॉल असोसिएशन या स्पर्धा विभागवार घेण्याच्या निर्णयापर्यंत आले आहेत. या निर्णयामुळे येथून पुढे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, औरंगाबाद व पुणे विभाग अंतर्गत स्पर्धा होऊन यातील विजेते संघाची निवड राज्य स्पर्धेसाठी होणार आहे.
कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर मंगळवारी प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यामध्ये झालेल्या सामन्यातील एक क्षण.
गोलचाही दुष्काळ
केएसए फुटबॉल लीग : दोन्ही सामने गोलशून्य बरोबरीत
कोल्हापूर : केएसए फुटबॉल लीग सामन्यात आज, मंगळवारी झालेले दोन्ही सामने गोलशून्य फरकाने बरोबरीत सुटले. प्रॅक्टिस ‘अ’ विरुद्ध ‘बालगोपाल’, तर कोल्हापूर पोलीस विरुद्ध प्रॅक्टिस ‘ब’ यांच्यातील सामन्यात एकही गोल झाला नाही. दोन्ही सामन्यांत गोलचा दुष्काळ पडल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी होती.
आज शाहू स्टेडियमवर पहिला सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यामध्ये झाला. दोन्ही संघांनी प्रारंभापासून आक्रमक पवित्रा घेतला. यामध्ये प्रॅक्टिस ‘अ’कडून झालेल्या चढाईमध्ये राहुल पाटीलने मारलेला फटका ‘बालगोपाल’चा गोलरक्षक अक्षय कुरणेने उत्कृष्टरीत्या बाहेर काढत त्यांची चढाई फोल ठरवली. पाठोपाठ ‘बालगोपाल’ संघाकडून केलेल्या चढाईमध्ये बबलू नाईकच्या पासवर ऋतुराज पाटीलची गोल करण्याची संधी हुकली. दोन्ही संघांनी सतत खाते उघडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, त्यांना अपयश आल्याने सामना संपेपर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नसल्याने सामन्यात गोलशून्य बरोबरी झाली.
दुसरा सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘ब’ विरुद्ध कोल्हापूर पोलीस फुटबॉल संघ यांच्यामध्ये झाला. दोन्ही संघांनी सामन्याच्या सुरुवातीला थोडा बचावात्मक खेळ केल्याने मध्यंतरापर्यंत सामना गोल शून्यफरकाने बरोबरीत होता. उत्तरार्धात दोन्ही संघांकडून खाते उघडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, ‘पोलीस’ संघाचा गोलरक्षक अमर आडसुळे व प्रॅक्टिस ‘ब’चा गोलरक्षक अमर पसारे यांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडल्याने सामना गोलशून्य फरकाने बरोबरीत सुटला.