आता प्रभागात दोन नगरसेवक
By Admin | Updated: October 7, 2014 00:03 IST2014-10-06T23:52:18+5:302014-10-07T00:03:08+5:30
महानगरपालिका : नव्या प्रभाग रचनेनुसार होणार निवडणूक

आता प्रभागात दोन नगरसेवक
कोल्हापूर : महापालिकेच्या येणारी सार्वत्रिक निवडणूक नव्या प्रभागवार रचनेनुसार होणार आहे. निवडणूक आयोगाच्या याबाबत स्पष्ट सूचना महापालिका प्रशासनास मिळाल्या आहेत. प्रभाग रचना कशा प्रकारे असावी, याचा अंतिम आदेश निवडणूक आयोगाकडून लवकरच प्राप्त होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेने हाती घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नव्या प्रभागवार रचनेचा आढावा तयार करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनास राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. आयोगाने नवी प्रभागवार रचना अत्यंत गुप्त ठेवण्याची ताकीदही दिली आहे. गोपनीयता न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेची निवडणूक नव्या प्रभागवार रचनेनुसार करण्यासाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे.
शहरात सध्या ७७ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात ५ किमान हजार मतदारांची संख्या आहे. नव्या रचनेनुसार दोन प्रभागांचा एक मतदारसंघ होणार आहे. मतदारांना दोन मते देण्याचा अधिकार असणार आहे. नव्या रचनेत एका प्रभागात किमान १० हजारांच्या पुढे मतदार असणार आहेत. नवीन रचनेचे प्राथमिक स्वरूप तयार करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.
ंनगरसेवकांत उत्सुकता
महापालिकेची पुढील वर्षी होणारी नव्या प्रभागवार रचना कशी असेल याबाबत नगरसेवकांत कमालीची उत्सुकता आहे. प्रभाग रचनेचा आराखडा व प्राथमिक माहिती अत्यंत गुप्त ठेवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार नवी प्रभागवार रचना पद्धतीची माहिती गुप्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचना आराखडा व प्रभाग रचनेचा आराखड्यासाठी आवश्यक सर्व प्राथमिक तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम संपताच या कामास गती येणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नवीन प्रभागवार प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.