आता साऱ्या देशाचे लक्ष ‘तेजस्विनी’च्या कामगिरीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST2021-07-31T04:24:50+5:302021-07-31T04:24:50+5:30
कोल्हापूर : टोकियो ऑलिम्पिक नेमबाजीतील ५० मीटर पिस्टल प्रकारातील कोल्हापूरच्या राही सरनोबत हिचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता सुवर्णकन्या तेजस्विनी ...

आता साऱ्या देशाचे लक्ष ‘तेजस्विनी’च्या कामगिरीकडे
कोल्हापूर : टोकियो ऑलिम्पिक नेमबाजीतील ५० मीटर पिस्टल प्रकारातील कोल्हापूरच्या राही सरनोबत हिचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत हिच्या कामगिरीकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. शनिवारी सकाळी तिचा ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारातील पात्रता फेरीतील सामना होणार आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय नेमबाजी संघात कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंत हिची ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात, तर राही सरनोबत हिची ५० मीटर पिस्टल प्रकारात निवड झाली होती. यासोबतच कोल्हापूरचा पॅरा नेमबाज स्वरूप उन्हाळकर याचीही पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. अशा प्रकारे कोल्हापूरच्या तिघांची एकाचवेळी ऑलिम्पिकसाठी निवड होण्याचा योग प्रथमच आला होता. त्यामुळे कोल्हापूरसह देशवासीयांच्या पदकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, ५० मीटर पिस्टल प्रकारात राहीकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. तिने शुक्रवारी सकाळी झालेल्या दुसऱ्या फेरीत ५७३ गुणांसह ३२ वे स्थान मिळविले. त्यामुळे तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. विश्व नेमबाजीमध्ये प्रथम स्थानावर असलेल्या राहीकडून शुक्रवारी गेल्या चार वर्षांतील सर्वांत कमी गुणांची नोंद झाली.
आता तेजस्विनीची शनिवारी सकाळी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारातील पात्रता फेरी आहे. तिला क्युबाच्या ई.वाय क्रूझ, झेकच्या एन. सोरोनोवा, एन. ख्रिस्टन, राॅकची करिमोवा, नार्वेची जे.एच. डस्टेड, इटलीची सिस्कारलो, अशा दिग्गज स्पर्धकांशी सामना करावा लागणार आहे. या प्रकारात भारताकडून दुसरी नेमबाज अंजूम मुडगिल हीही या स्पर्धेत नशीब अजमाविणार आहे.
प्रतिक्रिया
प्री क्वालिफिकेशनमध्ये गुरुवारी दोन शाॅट्स खराब झाले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या राउंडमध्ये गुणांची कमाई करण्याच्या नादात अपेक्षित कामगिरी झाली नाही. आता नव्याने पुढच्या ऑलिम्पिकसाठी तयारी करील.
- राही सरनोबत, भारतीय नेमबाज