भरलेला घरफाळा पुन्हा भरण्याच्या नोटिसा
By Admin | Updated: November 15, 2014 00:06 IST2014-11-15T00:04:36+5:302014-11-15T00:06:09+5:30
उद्यमनगरात खळबळ; महापालिकेशी संपर्काचे आवाहन

भरलेला घरफाळा पुन्हा भरण्याच्या नोटिसा
कोल्हापूर : उद्यमनगर, वाय.पी. पोवारनगर येथील व्यापारी व उद्योजकांना गेल्या तीन ते चार वर्षांतील भरलेला घरफाळा पुन्हा भरण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही संगणकीय प्रणालीतील चूक आहे. अशा पद्धतीने नोटिसा आलेल्या सर्वच नागरिकांनी भरलेल्या पावतीसह घरफाळा विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अन्य शहरांप्रमाणे उद्यमनगरात व्यापारी दराप्रमाणे घरफाळा न आकारता औद्योगिक कर लागू करावा, अशी येथील उद्योजकांची मागणी आहे. महापालिकेने व्यापारी व नागरी असे दोनच पर्याय ठेवले आहेत. मात्र, सहकार्य लांबच; २००९ पासून भरलेल्या घरफाळ्याच्या रकमेवर व्याजासह रकमेची मागणी ६००हून अधिक उद्योजकांकडे केली आहे.
तांत्रिक चूक
काही मिळकतधारकांना संगणकीय तांत्रिक चुकीमुळे थकबाकी बिले जाण्याचे प्रकार घडतात. मागील भरलेली बिले दाखवून ही चुकीची वाढ कमी करता येते. अशाप्रकारे चुकीची बिले आलेल्या मिळकतधारकांनी महापालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
भरलेला घरफाळा कमी करावा, इतर शहरांप्रमाणे नागरी, व्यापारी व औद्योगिक असे तीन पर्याय घरफाळा वसुलीत करावेत, या मागणीसाठी कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील आठवड्यात आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना भेटणार आहे.
- रवींद्र तेंडुलकर (अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन)