व्हॅट न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटिसा
By Admin | Updated: July 27, 2014 01:06 IST2014-07-27T01:03:39+5:302014-07-27T01:06:10+5:30
व्यापारीवर्गांत एकच खळबळ

व्हॅट न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटिसा
कोल्हापूर : विक्रेत्यांनी कर भरला नसल्यामुळे त्याला जबाबदार धरत शहरातील काही व्यापाऱ्यांना व्हॅट भरण्याच्या नोटिसा विक्रीकर व आयकर विभागाने पाठविल्या आहेत. सुमारे २०० कोटींचा कर भरण्याच्या नोटिसीमुळे काही व्यापारी दिवाळखोरीत निघण्याची भीती व्यक्तहोत असून व्यापारीवर्गांत एकच खळबळ उडाली आहे. तथापि, या नोटिसांना घाबरुन न जाता व्यापाऱ्यांनी पुढे येऊन न्यायालयीन लढा लढण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगांवकर यांनी केले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून शहरातील असंख्य व्यापाऱ्यांना विक्रीकर व आयकर विभागाच्या नोटिसा येत आहेत. व्यापाऱ्यांनी प्रामाणिकपणे व्हॅट भरला; परंतु नंतर तो विक्रेत्यांनी भरला नसल्याची बाब विक्रीकर विभागाच्या निदर्शनास आली. सन २००६ पासून हा प्रकार होत आला आहे. काही राजकीय शक्ती आणि दोन नंबरमध्ये व्यापार करणाऱ्या विक्रेत्यांच्या साखळीचा यात मोठा संबंध आहे. विक्रेत्यांनी व्हॅट भरला नाही याला थेट जबाबदार धरत काही व्यापाऱ्यांनाच नोटिसा पाठविण्याच्या या अजब प्रकाराने व्यापारी हबकून गेले आहेत. एकेका व्यापाऱ्याना १ कोटीपासून ४ कोटी थकबाकीसह कर भरण्याच्या नोटिसा मिळाल्या आहेत. ज्यांनी बोगसगिरी केली त्यांच्याकडूनच व्हॅट वसूल करावा, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. याबाबत आज, शनिवारी व्यापारी व उद्योजक महासंघाच्या बैठकीत व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, ज्यांना अशा नोटिसा आल्या आहेत त्यांनी न्यायालयीन लढाईसाठी सज्ज राहावे. ‘फाम’तर्फे न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगांवकर यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. बैठकीला अमर क्षीरसागर, प्रवीण शाह, विनोद कटारिया, बाबा महाडिक, सुरेश गायकवाड, संजय रामचंदाणी, अमोल नष्टे, सचिन शहा, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)