'केएमटी'च्या ५२ कर्मचाऱ्यांना नोटिसा
By Admin | Updated: November 21, 2015 00:28 IST2015-11-20T23:34:17+5:302015-11-21T00:28:58+5:30
पूर्वसूचनेशिवाय गैरहजर : २८ रोजंदारी कर्मचाऱ्यांना केले कामावरून कमी

'केएमटी'च्या ५२ कर्मचाऱ्यांना नोटिसा
कोल्हापूर : कोणतीही पूर्वसूचना न देता परस्पर कामावर गैरहजर राहून संस्थेचे नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध के.एम.टी. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. दिवाळीसारख्या सणाच्या काळात कामावर येणे आवश्यक असतानाही जाणीवपूर्वक गैरहजर राहिलेल्या २८ रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने सेवेतून काढून टाकले, तर ५२ कायम कर्मचाऱ्यांना नोटिसा लागू करून ‘तुम्हास कामावरून का कमी करू नये,’ अशी विचारणा केली आहे.
या महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात के.एम.टी. कर्मचाऱ्यांनी बऱ्याच दांड्या मारल्या, पूर्वसूचना न देता कामावर गैरहजर राहिले आहेत. एका दिवसात तर रोजच्या २६ हजार किलोमीटर्स अंतराच्या फेऱ्यांपैकी पाच हजार किलोमीटर्सपर्यंतच्या फेऱ्या चालक, वाहक यांच्या गैरहजेरीमुळे रद्द कराव्या लागल्या. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास येताच अशा कामचुकार कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची भूमिका स्वीकारली. के.एम.टी.कडे काम करणाऱ्या वाहक, चालकांचे रेकॉर्ड तपासण्याचा निर्णय घेतला.
ज्या वाहक, चालकांची हजेरी पन्नास टक्क्यांपैकी कमी आहे, अशांवर कारवाईचा बडगा उगारला. पन्नास टक्क्यांपेक्षा कमी हजेरी भरलेल्यांमध्ये रोजंदारीवरील १७ वाहक व ११ चालकांचा समावेश होता. या सर्वांना कोणतीही सूचना न देता कामावरून कमी केले आहे. खुलासा करण्याची कसलीही संधी प्रशासनाने त्यांना दिली नाही.
कायम सेवेतील २८ वाहक व २४ चालक अशा एकूण ५२ कर्मचाऱ्यांंना नोटिसा पाठविल्या आहेत. विभागीय चौकशी करून निलंबित अथवा बडतर्फ का करूनये, अशी विचारणा आयुक्तांनी केली आहे. येत्या सात दिवसांत लेखी म्हणणे मांडण्याची संधी त्यांना दिली आहे. त्यांच्याकडून खुलासे काय येतात, हे पाहून त्यांच्यावरील कारवाईचे स्वरूप ठरविले जाणार आहे.
के.एम.टी.कडील काही रोजंदारी चालक खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करीत असतात. त्यामुळे सणाच्या दिवसांत सुट्ट्या पडल्या की ते के.एम.टी. सेवेपेक्षा खासगी वाहतुकीला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांना चार पैसे जादा मिळतात, असा त्यांचा दावा आहे; परंतु अशा कर्मचाऱ्यांनी अचानक दांड्या मारल्यावर प्रवाशांच्या सेवेवर तसेच के.एम.टी.च्या उत्पन्नावरही त्यांचा विपरीत परिणाम होतो, म्हणून अशा कामचुकार कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक भूमिका घ्यायचे प्रशासनाने ठरविले आहे. (प्रतिनिधी)
ज्या कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठविल्या आहेत, त्यांना सात दिवसांची मुदत दिली आहे. त्यांचे खुलासे पाहून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे अशा दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
- संजय भोसले,
अति. वाहतूक व्यवस्थापक