ध्वनिक्षेपकाद्वारे मिळणार संभाव्य महापुराची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST2021-07-12T04:15:41+5:302021-07-12T04:15:41+5:30

गणपती कोळी कुरुंदवाड : संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्ह्यातील पूरबाधित ६०० गावांत सार्वजनिक उद्घोषणा ...

Notice of possible flood will be received by the loudspeaker | ध्वनिक्षेपकाद्वारे मिळणार संभाव्य महापुराची सूचना

ध्वनिक्षेपकाद्वारे मिळणार संभाव्य महापुराची सूचना

गणपती कोळी

कुरुंदवाड : संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्ह्यातील पूरबाधित ६०० गावांत सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली बसविण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे जिल्ह्यात एकाच वेळी सर्व गावांना महापुराच्या सूचना त्वरित मिळणार आहेत. त्यामुळे संभाव्य महापुरात नागरिकांना जीवित आणि वित्तहानी टाळता येणार आहे. पहिल्या टप्प्यात १२९ गावात यंत्रणा सज्ज झाली असून २० जुलैपासून ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे.

महापुराच्या संकटाला जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रत्येक वर्षी सामना करावा लागतो.

या संकटाला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यरत असते. ज्या त्या तालुक्यातील, गावातील रेस्क्यू फोर्सच्या जवानांच्या मदतीने पूरग्रस्तांना मदत करत जीवितहानी टाळण्याचा प्रयत्न करत असते.

या रेस्क्यू फोर्स बरोबरच पूरबाधित गावांना नद्यांची पूरस्थिती, धरणांतील पाण्याचा विसर्ग, अतिवृष्टी यामुळे पूरबाधित गावांनी, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने जिल्ह्यातील पूरबाधित १२९ गावांत सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली बसविण्यात आली आहे. महापुराचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसत असल्याने तालुक्यातील ४२ गावांत ही प्रणाली बसविण्यात आली आहे. जीएसएम तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्याच्या ठिकाणाहून पुरासंबंधी एकाच वेळी माहिती प्रसारित केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावांतील मुख्य ठिकाणी टॉवर उभारून त्याच्यावर ध्वनिक्षेपक बसविण्यात येत आहे. या प्रणालीमुळे पूरबाधित गावांना पुराच्या संभाव्य धोक्याची माहिती मिळणार असल्याने नदीकाठच्या लोकांना जीवितबरोबर वित्तहानी टाळता येणार आहे.

----------------------

कोट - या प्रणालीमुळे आपत्तीकाळात जिल्ह्यातील प्रत्येक गावांत एकाचवेळी सतर्कतेचा संदेश देता येणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील पूरबाधित एकूण ६०० गावात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील १२९ गावातील ही यंत्रणा पूर्ण झाली असून २० जुलैपासून ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

- प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कोल्हापूर

फोटो - ११०७२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीसाठी नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे उभारण्यात आलेले ध्वनिक्षेपक.

Web Title: Notice of possible flood will be received by the loudspeaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.