पंचगंगा प्रदूषणप्रश्नी ‘राजाराम’ला नोटीस
By Admin | Updated: April 7, 2015 01:16 IST2015-04-07T00:58:57+5:302015-04-07T01:16:29+5:30
नदीत दूषित पाणी सोडले : शिये पाणवठ्याजवळ मासे मेल्याने गंभीर दखल

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी ‘राजाराम’ला नोटीस
कोल्हापूर : शिये (ता. करवीर) हद्दीत पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणात मासे मेल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. त्यानंतर प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) तक्रार दाखल करून पंचनामा करण्याची मागणी केली. सोमवारी तक्रारदारांसह एमपीसीबी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कसबा बावड्यातील राजाराम बंधारा ते शिये पूलदरम्यान नदीपात्राचा पंचनामा केला. यावेळी उंबरमळी भागातून राजाराम साखर कारखान्याने मळीमिश्रित पाणी नदीत सोडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मंडळाने सात दिवसांत खुलासा करण्याची नोटीस कारखान्यास बजावली.
शिये नदीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात दूषित पाण्यामुळे मासे मेल्याचा प्रकार उघडकीस आला. उच्च न्यायालयात पंचगंगा प्रदूषणप्रश्नी २३ एप्रिलला सुनावणी होणार आहे. त्यातच मासे मेल्याची घटना घडल्याने प्रशासनात खळबळ उडाली. दिलीप देसाई यांच्या तक्रारीवरून मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके, उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर, नायब तहसीलदार एम. ए. शिंदे, मत्स्य विभागाचे प्रतिनिधी एच. एस. जाधव, महापालिकेचे प्रतिनिधी तेजस्विनी माळी, राजाराम कारखान्याचे प्रतिनिधी नंदकुमार जाधव यांनी राजाराम बंधारा ते शिये पाणवट्यापर्यंत नदीची पाहणी केली.
यावेळी केलेल्या पाहणीत राजाराम बंधाऱ्याच्या वरील बाजूस पाणी स्वच्छ असून एकही मासा मेल्याचे आढळले नाही. थोड्या अंतरावरून शियेकडील बाजूच्या नदीच्या दोन्हीपात्राच्या बाजूला मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याचे उघडकीस आले. नदीच्या पाण्यावर हिरवट तेलकट तवंग आढळला. राजाराम कारखान्याच्या पश्चिमेच्या बाजूस अंदाचे ५०० मीटरच्या अंतरावर असणाऱ्या उंबरमळी या भागात शेतालगत भूमिगत पाईपलाईनद्वारे राजाराम कारखान्यातून सांडपाणी नदीत मिसळत असल्याचे पथकाला आढळले.
आजूबाजूचे गवत व झुडपे जळून दूषित पाणी नदीत मिसळत असल्याची नोंद मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पंचनाम्यात केली. येथील पाणी मंडळाने तपासणीसाठी घेतले तसेच राजाराम कारखान्यास जलप्रदूषण कायदा १९७४ व वायू प्रदूषण कायदा १९८१ तसेच दूषित पाणी विल्हेवाट अधिनियमन २००८ नुसार कारवाईची नोटीस कारखाना व्यवस्थापनास बजावली. सात दिवसांत कारखान्याने खुलासा करण्याचे आदेश उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांनी नोटिसीद्वारे दिली आहे. (प्रतिनिधी)
पंचगंगा नदीपात्र क्षेत्रात पाच साखर कारखाने आहेत. आता हंगाम संपत आल्याने कारखाना धुतल्यानंतरचे पाणी नदीत सोडण्याचा प्रकार घडण्याची शक्यता आहे. ‘राजाराम’सह या उर्वरित कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी २३ एप्रिलला उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मागणी करणार आहे. - दिलीप देसाई
कारखाना ३१ मार्चला बंद झाला आहे. त्यामुळे दूषित पाणी सोडण्याचा प्रश्नच येत नाही. नदी प्रदूषणाबाबत कोणतीही नोटीस कारखान्यास मिळालेली नाही. अशी नोटीस आल्यास कारखानाही त्यास कायदेशीर उत्तर देईल.
- आर. सी. पाटील
(कार्यकारी संचालक)