गैरहजर राहणाऱ्या अडत्यांना नोटिसा
By Admin | Updated: September 23, 2014 00:46 IST2014-09-23T00:36:20+5:302014-09-23T00:46:17+5:30
सदस्यांची बैठकीत सूचना : अशासकीय सदस्य कमालीचे संतप्त

गैरहजर राहणाऱ्या अडत्यांना नोटिसा
कोल्हापूर : सूचना देऊनही बैठकीला दांडी मारणारे अडते व व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्याची सूचना कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय सदस्यांनी आज दिली. गूळ नियमन रद्द व शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठक आयोजित केली होती, पण याकडे अडते व व्यापाऱ्यांनी पाठ फिरविल्याने सदस्य आक्रमक झाले आहेत.
नियमन रद्द झाल्याने गुळाचे सौदे कसे काढायचे याबाबत पेच निर्माण झाला आहे. त्यावर गेले महिनाभर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. मध्यंतरी बाजार समितीने शेतकरी, अडते व व्यापाऱ्यांच्यामध्ये सामंजस्य करार झाल्याची घोषणा केली होती पण आज पुन्हा याबाबत शेतकरी प्रतिनिधी, अडते व व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांनी पुन्हा जुन्याच मुद्द्यांची उजळणी केली.
अडत कमी करावी, खराब रव्यांचा लागलाच सौदा व्हावा, सात दिवसांत गुळाची पट्टी मिळावी, ‘जी.आय.’ मार्कची अंमलबजावणी करावी, संपूर्ण गुळाचे वजनमाप करावे, एक किलो गूळ रव्यांच्या बॉक्ससह वजन करावे, अशा मागण्या गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी बैठकीत केल्या.
अडत कमी करण्यास अडत्यांचा विरोध असल्याचे प्रशासनाने सांगितले. अडत्यांना बाजूला करून विकास संस्थांमार्फत सौदे काढण्याबाबत चर्चा झाली. पण ते संस्थांना शक्य नाही.
संस्थांकडे गूळ साठवण्याची व्यवस्था नाही, त्याचबरोबर आगाऊ उचलीचा प्रश्नही असल्याचे सदस्य मधुकर जांभळे यांनी सांगितले. जुन्या पद्धतीनेच गुळाचे सौदे पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. बैठक असल्याचे कळवूनही न आलेले अडते, व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना मधुकर जांभळे व बाजीराव पाटील (वडणगेकर) यांनी केली. यावेळी अशासकीय मंडळाचे अध्यक्ष आर. के. पोवार, सदस्य बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, सत्यजित जाधव, सुभाष पाटील, वैभव सावर्डेकर, सचिव संपतराव पाटील, उपसचिव विजय नायकल, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, बाळासाहेब पाटील, पंचायत समितीचे सदस्य तानाजी आंग्रे, शिवाजी पाटील, उत्तम पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी, दि. २८ दुपारी एक वाजता होत आहे. अशासकीय मंडळाचे अध्यक्ष आर. के. पोवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत बाजार समितीचे गेल्या वर्षभरात घडलेल्या घडामोडींचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
बाजार समितीची सर्वसाधारण सभेला कार्यक्षेत्रातील विकास संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामपंचायतींचे सदस्य, खरेदी-विक्री संस्थांचे प्रतिनिधी, व्यापारी, अडते, हमाल, तोलाईदार उपस्थित असतात. गेले वर्षभरात बाजार समितीमध्ये कमालीच्या घडामोडी झाल्या आहेत. संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक आले. प्रशासकांना हटवून अशासकीय मंडळ कार्यरत आहे. त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता अधिक आहे. संचालक मंडळाने केलेला कारभार, नोकरभरती त्यावर झालेला खर्च, बाजार समितीतील असुविधा याचा पाढा वाचण्यासाठी काहींनी तयारी केली आहे.
गूळ हंगाम तोंडावर आहे, गेले हंगामात सातत्याने सौदे बंद पडले होते, त्यामुळे विकास संस्थांचे प्रतिनिधीही आक्रमक होण्याची शक्यता आहे. बाजार समितीतील रस्ते, गटर्स, कचरा आदी समस्यांबाबत व्यापारी व अडत दुकानदार हैराण आहेत. या प्रश्नांवरही जोरदार विचारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.