जैतापूर प्रकल्पविरोधक २५जणांना नोटीस जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2015 00:54 IST2015-12-10T00:29:41+5:302015-12-10T00:54:39+5:30
जनहक्क सेवा समिती : शनिवारच्या आंदोलनाबाबत उत्सुकता

जैतापूर प्रकल्पविरोधक २५जणांना नोटीस जारी
राजापूर : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधात जनहक्क सेवा समितीने पुकारलेल्या १२ डिसेंबर रोजीच्या जेलभरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सुमारे २५ प्रमुख आंदोलनकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. प्रकल्प स्थळापासून एक किलोमीटर परिसरात मनाई आदेश लागू केला आहे. त्यामुळे आता हे आंदोलन कशा प्रकारे होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी जनहीत सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाशी समझोत केल्यामुळे व येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भूसंपादनाचे अनुदान स्वीकारल्यामुळे गेल्या दोन - तीन वर्षांपासून प्रकल्पविरोधी धार कमी झाली होती. माडबनवासीयांनी या प्रकल्पाच्या विरोधातून काढता पाय घेतल्यानंतर या प्रकल्पविरोधाची धार बोथट झाली होती.दरम्यानच्या काळात शिवसेना व प्रकल्प परिसरातील काही गावांमधील लोकांनी एकत्र येऊन या प्रकल्पाविरोधात जनहक्क समिती स्थापन करून आपला विरोध कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये साखरीनाटेतील मच्छिमार बांधवांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी रत्नागिरीतही एक मोर्चा काढला होता.
या जेलभरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख २५ नेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत, तर याबाबतची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे. यासाठी जिल्हाभरातून पोलीस फौजफाटा मागवण्यात आल्याची माहिती सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक मेघना बुरांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानेही प्रकल्पस्थळापासून १ किमीच्या परिसरात मनाई आदेश लागू केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आत जनहक्क समिती व शिवसेनेने पुकारलेले हे आंदोलन कितपत यशस्वी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
संताप : प्रकल्पाविरोधी पुन्हा एल्गार
जपानचे पंतप्रधान अँबे शिंके हे भारत भेटीवर येत असून, त्यांच्या या दौऱ्यात अणुऊर्जा कार्यक्रमावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या जनहक्क समिती व शिवसेनेने १२ डिसेंबर रोजी जेलभरो आंदोलन पुकारुन प्रकल्पाविरोधात पुन्हा एकदा एल्गार केला आहे.
जनहीत सेवा समितीने या प्रकल्प विरोधातून आपले अंग काढून घेतल्यानंतर फारशी आंदोलने झाली नाहीत. माडबन परिसरातील जनतेनेही या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे आता १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या प्रकल्पविरोधी जेलभरो आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आंदोलकांची कोंडी
प्रशासनाने जैतापूरविरोधक आंदोलकांची याही आंदोलनात कोंडी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे हे आंदोलन कसे होणार? याबाबत उत्सुकता आहे.