जिल्हा बँकेतही नोटा बदलून मिळणार
By Admin | Updated: November 11, 2016 00:50 IST2016-11-11T00:52:09+5:302016-11-11T00:50:08+5:30
‘आरबीआय’ने दिली परवानगी : मात्र पहिला दिवस गेला गोंधळात

जिल्हा बँकेतही नोटा बदलून मिळणार
जिल्हा बँकेतही नोटा बदलून मिळणार
‘आरबीआय’ने दिली परवानगी : मात्र पहिला दिवस गेला गोंधळात
कोल्हापूर/पुणे/मुंबई : राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेत इतर बँकांप्रमाणेच पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार असून, खातेदारांना आपल्या खात्यात या नोटा भरता येतील, असा निर्णय रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) घेतला आहे. मात्र, पतसंस्थांना हा निर्णय लागू नसल्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले.
पैसे बदलून देण्यास खासगी व सरकारी बँकांत सुरुवात झाली. मात्र, त्यात आरबीआयने जिल्हा मध्यवर्ती बँकांचा समावेश केला नव्हता. गुरुवारी अनेकांनी जिल्हा बँकांमध्ये गर्दी केली होती. ही बाब सहकार आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर आरबीआयशी संपर्क साधला. आरबीआयने गुरुवारी सुधारित पत्रक काढत जिल्हा मध्यवर्ती बँकेला पैसे बदलून देण्याची मुभा दिली.
नव्या धोरणामुळे गुरुवारी कमी रकमेचे वाटप : प्रतापसिंह चव्हाण
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या जिल्ह्यात १९१ शाखा असून, त्यामधून सुमारे ६० कोटी रुपयांचा बॅलन्स असतो; परंतु रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणानुसार शंभर रुपयांच्याच नोटांचे वाटप करायचे असल्याने गुरुवारी कमी रकमेचे वाटप झाल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रतापसिंह चव्हाण यांनी सांगितले.
रिझर्व्ह बँकेकडून पुरेसा चलन पुरवठा
रिझर्व्ह बँकेचे चलन पुरविण्याची सुविधा स्टेट बँक व रत्नाकर बँकेकडे आहे. या बँका आपल्याला हवी तेवढी कॅश ठेवून घेऊन राहिलेली कॅश जिल्हा बँकेला देत असत. त्यामुळे जिल्हा बँकांच्या शाखांमध्ये पुरेशी कॅश नसल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. त्याबद्दलही रिझर्व्ह बँकेपर्यंत तक्रारी झाल्या. त्यानंतर आता जिल्हा बँकांनाही पुरेशा स्वरूपात चलन उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
स्पष्ट आदेश नसल्याने काही जिल्हा बँकांनी राज्य शिखर बँकेशी संपर्क साधून मार्गदर्शन मागविले. जुन्या नोटा स्वीकारण्याबाबत रिझर्व्ह बँकेने ८ नोव्हेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकात जिल्हा बँकांचा नामोल्लेख नसल्याचे कळविले.
केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात जिल्हा बँकांचा उल्लेख नसल्याचे कारण पुढे करत, या बँकांनी नोटा स्वीकारू नयेत, असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले. त्यानुसार राज्य शिखर बँकेने तसा ई-मेल सर्व जिल्हा बँकांना पाठविला. त्यानंतर व्यवहार थांबविण्यात आले. मात्र, दुपारनंतर त्यात दुरुस्ती झाली.
नामोल्लेख नसल्याने झाली पंचाईत
राज्यातील ३१ जिल्हा बँकांच्या
3746
शाखा गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे उघडल्यानंतर ५००
व १००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या. काही जिल्हा बँकांनी जुन्या नोटा स्वीकारून त्याबदल्यात नव्या नोटा ग्राहकांना देऊ केल्या.
राज्यातील पतसंस्थांना अजूनही पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारता येणार नाही.
राज्यात पंधरा हजार पतसंस्था आहेत. त्यांनाही नोटा बदलून देण्यास परवानगी दिल्यास अधिक नागरिकांपर्यंत पोहोचता येईल.
तसेच या यंत्रणेची मोठ्याप्रमाणावर मदत होईल. पतसंस्थांना अशी परवानगी दिल्यास इतर बँकांमध्ये होणारी गर्दी कमी होईल. तशी मागणी आरबीआयकडे करण्यात आली असल्याची माहिती दळवी यांनी दिली.
रिझर्व्ह बँकेच्या आदेशात जिल्हा बँकांचा उल्लेख नसल्याने नोटा स्वीकारणे बंद केले होते. मात्र, उद्यापर्यंत सुधारित आदेश येऊन व्यवहार सुरळीत होतील.-प्रमोद कर्नाड, मुख्य कार्यकारी
अधिकारी, राज्य शिखर बँक