उत्तर प्रदेश नव्हे, प्रश्न प्रदेश
By Admin | Updated: August 17, 2014 22:35 IST2014-08-17T22:21:07+5:302014-08-17T22:35:29+5:30
राम नाईक : राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

उत्तर प्रदेश नव्हे, प्रश्न प्रदेश
कोल्हापूर : श्रीराम-कृष्णांची जन्मभूमी, सुफी संत व गौतम बुद्धांची कर्मभूमी व यमुना-गंगेचे पवित्र खोरे अशी उत्तर प्रदेशची असणारी ओळख पुसली जात आहे. जातीय दंगली, भ्रष्टाचार, खून, बलात्कार यांचे
प्रमाण उत्तर प्रदेशात वाढत आहे. तो उत्तर प्रदेश नव्हे, प्रश्न प्रदेश बनला
आहे. राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच उत्तर प्रदेशमधील परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न राहील, असे प्रतिप्रादन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी आज, रविवारी येथे पत्रकार परिेषदेत केले.
उत्तर प्रदेशासारखी परिस्थिती देशात इतरही राज्यांत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही, असेही नाईक यांनी स्पष्ट केले. नाईक म्हणाले, उत्तर प्रदेशात तब्बल २४ विश्वविद्यालये आहेत; मात्र गेल्या चार वर्षांत एकाही विद्यापीठातील दीक्षांत समारंभ झालेला नाही. कल्पनेशी अतिशय विसंगत अशीच परिस्थिती सध्या उत्तरप्रदेशात आहे.
येथील घटनांचे गांभीर्य मोठे आहे, तरीही केंद्र व राज्य यांच्यात
कोणताही संघर्ष न होता, घटनात्मक चौकटीत राहून परिस्थिती
आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यावर विशेष भर राहील. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी प्रत्येक घटनेबाबत चर्चा करून केंद्राशी समन्वय सुरू आहे. (प्रतिनिधी)
कोल्हापुरी असल्याचा अभिमान
कोल्हापूर संस्थानातील निपाणीजवळील पट्टणकुडी येथे जन्म व त्यानंतर औंध संस्थानातील आटपाडी या गावी दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. मी कोल्हापुरी असल्याचा मला अभिमान आहे . - राम नाईक, राज्यपाल उत्तर प्रदेश.
कुष्ठरोग्यांसाठी मुंबई महापालिकेने दोन हजार रुपये मासिक मानधन देण्याचे योजले आहे. याच धर्तीवर कोल्हापूर महापालिकेने ेयेथील २५० ते ३०० च्या संख्येने असलेल्या कुष्ठरोगी कुटुंबीयांना मासिक मानधन द्यावे. शहरातील मोठे उद्योजक व दानशूर व्यक्तींंनी कुष्ठरोग्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, त्यांच्यासाठी मदतीची भूमिका घ्यावी, असे आवाहन राज्यपाल नाईक यांनी केले.
लक्ष्मणरेषा पाळली
राम नाईक यानी राजकीय प्रश्नांना खुबीने बगल दिली. येळ्ळूर येथे मराठी भाषिकांना झालेल्या मारहाणीबाबत दु:ख व्यक्त करीत अधिक बोलणेही टाळले. उत्तर प्रदेशातील दोन वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुका, राज्यात मुख्यमंत्रिपदाची शर्यत, आदी प्रश्नांना बगल देत, ‘मला लक्ष्मणरेषा पाळावीच लागेल’ असे स्पष्ट केले.