पक्ष नव्हे... नेत्यांचीच कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:14+5:302021-02-05T07:07:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कदमवाडी : भाजप-ताराराणी आघाडीचे वर्चस्व असलेला आणि गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार लढत दिलेला प्रभाग क्रमांक ...

पक्ष नव्हे... नेत्यांचीच कसोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
कदमवाडी : भाजप-ताराराणी आघाडीचे वर्चस्व असलेला आणि गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार लढत दिलेला प्रभाग क्रमांक १७ सदर बाजार हा प्रभाग यंदा सर्वसाधारण झाल्याने या प्रभागात ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात गुलाल अंगावर घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेटाने कामाला लागली असली, तरी पारंपरिक विरोधक महाडिकांच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटीलही आपली शक्ती पणाला लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रभागात महाडिक-पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. प्रामुख्याने झोपडपट्टीचा समावेश असलेल्या या प्रभागात गत निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार स्मिता माने यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार स्नेहल जाधव यांचा ४०९ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली लक्षणीय मते पाहता, यंदा राष्ट्रवादी या प्रभागात आपले सर्वस्व पणाला लावणार आहे. हा प्रभाग यंदा सर्वसाधारण झाल्याने बहुतांश इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. भाजप-ताराराणी आघाडीकडून विद्यमान नगरसेविका स्मिता माने पुन्हा इच्छुक आहेत. त्या किंवा त्यांचे पती हे उमेदवार असू शकतात. त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरु केली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक जो निर्णय घेतील, त्यानुसार त्यांची दिशा ठरणार आहे. नगरसेविका असताना केलेली कामे व मंथन फाऊंडेशनच्या माध्यमातून माने या जनतेच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीतर्फे माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्या अनुषंगाने ते कामालाही लागले आहेत. गत निवडणुकीत लाटकर पती-पत्नी या प्रभागातून उमेदवार नव्हते. मात्र, सामाजिक कार्यातून त्यांनी या प्रभागात आपला संपर्क कायम ठेवला होता. स्वत: स्थायी समिती सभापती व पत्नी माजी महापौर सुरमंजिरी लाटकर यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावरच त्यांनी या प्रभागावर आपली दावेदारी सांगितली आहे. काँग्रेसतर्फे प्रवीण पुजारी व संजय दाभाडे यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेतर्फे राजू डाले किंवा त्यांचा मुलगा उमेदवार असण्याची शक्यता आहे. बसपातर्फे अजय कुरणे हे महापालिकेत जाण्यासाठी इच्छुक आहेत. वंचित आघाडीतर्फे प्रवीण वाघमारे यांनीही रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. या प्रभागात उदंड इच्छुक असले तरी भाजप-ताराराणी आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच चुरशीचा सामना रंगणार आहे. यात पारंपरिक विरोधक असलेल्या महाडिक गटाचा पराभव करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील हेही आपले सर्वस्व पणाला लावण्याची शक्यता असल्याने या प्रभागातील लढत रंगतदार होणार, हे निश्चित आहे.
प्रभाग क्रमांक १७ सदर बाजार कदमवाडी. विद्यमान नगरसेविका - स्मिता मारुती माने. आताचे आरक्षण : सर्वसाधारण
गत निवडणुकीतील उमेदवारांना मिळालेली मते : स्मिता माने - भाजप-ताराराणी आघाडी १,६९१, स्नेहल जाधव - राष्ट्रवादी १,२८२, अखतर बी. बेपारी - शिवसेना ६१८, शिवानी ठोकळे - काँग्रेस १४६, प्रियांका कांबळे - बसपा १२३.
कोट : आगामी निवडणुकीत आरक्षण बदलले असले तरी नगरसेविका तसेच मंथन फाऊंडेशनच्या माध्यमातून केलेले काम मतदारांसमोर आहे. माझ्या कामावर मी समाधानी आहे. भाजप-ताराराणी आघाडीकडून मी इच्छुक असून, आघाडीकडून देण्यात येणाऱ्या उमेदवाराला मतदार पुन्हा संधी देतील, असा विश्वास आहे. - स्मिता माने, विद्यमान नगरसेविका.
सोडवलेले नागरी प्रश्न : प्रभागातील कॉलनीतील गटारांचे कामे पूर्ण आहे. प्रभागातील ८० टक्के रस्ते पूर्ण आहेत. अमृत योजनेंतर्गत रस्त्यांची कामे पूर्णत्वाच्या दिशेने आहेत. युवकांसाठी व्हाॅलिबॉल व कबड्डी ग्राऊंड तयार केले आहे. सभागृहाचे नूतनीकरण, बुद्धविहार सभागृहाला गेट, प्रसाधनगृह बांधले आहे. आमदार फंडातून जीम उभारली.
रखडलेले प्रश्न : २५ लाख रुपये मंजूर होऊनही लॉकडाऊनमुळे किंग ट्रेक पूर्ण करता आलेला नाही. विरंगुळा केंद्राचे काम सुरू आहे.