वाहनतळ नव्हे; पैसे वसुलीचा अड्डा
By Admin | Updated: November 24, 2014 23:59 IST2014-11-24T23:40:03+5:302014-11-24T23:59:17+5:30
बिंदू चौक पे अँड पार्क : कमाई लाखात; मात्र सुविधांचे तीनतेरा, शौचालय, डांबरीकरणाचा अभाव, सुरक्षितता रामभरोसे

वाहनतळ नव्हे; पैसे वसुलीचा अड्डा
एकनाथ पाटील - कोल्हापूर -अंबाबाई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर वाहनतळ असल्याने याठिकाणी भाविकांची वाहने पार्किंग करण्यासाठी मोठी गर्दी असते. तासाला तीस रुपयांप्रमाणे भाडे आकारून लाखो रुपये ठेकेदाराच्या पदरात पडत असताना याठिकाणी सुविधा मात्र शुन्य आहेत.
शौचालय नाही, की डांबरीकरण नाही, वाहनांची सुरक्षितता रामभरोसे अशा गंभीर परिस्थितीत भाविकांकडून फक्त पैसे उकळण्याचे काम येथील ठेकेदार करीत आहे. पाच मिनिटे जादा वेळ गाडी थांबून राहिली तरी तासाचे भाडे आकारण्यासाठी वसुली करून भाविकांना वेठीस धरले जात आहे. अनेकवेळा याठिकाणी वादावादीचे प्रसंग घडत असूनही महापालिका व पोलीस प्रशासन मात्र त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.
‘अंबाबाई’च्या दर्शनासाठी नेहमी भाविकांची गर्दी असते. बहुतांशी परजिल्ह्यांतील भाविक आपली वाहने बिंदू चौक येथील वाहनतळावर पार्किंग करतात. या वाहनतळाचे सर्वाधिकार महापालिकेच्या परिवहन विभागाकडे आहेत; परंतु त्यांनी वाहनतळाचा ठेका करार पद्धतीवर खासगी ठेकेदाराला दिला आहे. येथील ठेकेदार मात्र भाविकांच्या वाहनधारकांसाठी कोणतीही सुविधा न देता त्यांच्याकडून तासाला
३० रुपयांप्रमाणे भाडे आकारण्याचे काम सुरू आहे.
ठेकेदाराचे कर्मचारी झाडाखाली खुर्ची टाकून डोळ्यावर गॉगल लावून बसलेले असतात. त्यांचे बोलणे, वागणे गुंडांसारखे असल्याने भाविक काही न बोलता गाडी पार्किंग करून जात असतात. दर्शन घेऊन परततात त्यावेळी जितका वेळ गाडी उभी आहे तेवढ्या वेळेचे भाडे त्यांच्याकडून आकारले जाते. काहीवेळा भाडे कमी करण्यासाठी भाविक विनंती करतात; परंतु वसुली कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत सक्तीने वसुली करून घेतात.
पाच मिनिटे उशीर झाला, तरी तासाचे भाडे आकारले जाते. त्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला तर प्रसंगी धक्काबुक्कीही केली जात असल्याच्या तक्रारी भाविकांच्या आहेत. हे कर्मचारी याच परिसरातील रहिवासी असल्याने त्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेच्या निविदेमध्ये वाहनतळ सर्वसुविधांयुक्त असावे, असा नियम आह; परंतु याठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही, शौचालय-मुतारी नसल्याने काही भाविक वाहनांच्या आडोशाला लघुशंकेसाठी व शौचालयास बसतात. त्यामुळे याठिकाणी दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरत आहे.
या वाहनतळाला लागून बिंदू चौक कारागृह व नागरी वस्ती आहे. येथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. डांबरीकरण नसल्याने पावसाळ्यामध्ये याठिकाणी चिखलामध्येच पार्किंग करावी लागतात. काहीवेळा येथील दुरवस्था पाहून काही भाविक बिंदू चौक सर्कलच्या बाजूला पार्किंग करतात. अशावेळी पार्किंग वसुली कर्मचारी वाहतूक पोलिसांना फोन लावून वाहने उचलण्यासाठी सांगतात.
भाड्यापाठोपाठ कमिशनही
येथील पार्किंगचा ठेका अंदाजे २५ ते ३० लाखांपर्यंत दिला जातो. दिवाळी, दसरा, गणपती, मे महिन्याच्या सुटीमध्ये भाविकांची गर्दी असल्याने याठिकाणी दिवसाला ७० हजार रुपयांची कमाई होत असते. त्यामुळे या वाहनतळाचा ठेका मिळविण्यासाठी चढाओढ नेहमीच सुरू असते. वाहनतळ परिसरात असणाऱ्या चहागाड्यांचे महिन्याला कमिशन ठरलेले आहे. ते न चुकता संबंधित ठेकेदाराला दिले जाते. त्याचबरोबर काही लॉजिंग, हॉटेलमधील एजंटांचाही वावर याठिकाणी आहे. एखादी गाडी पार्किंग होताच त्यांच्या मागोमाग जाऊन आपल्या हॉटेल किंवा लॉजिंगवर त्यांना राहण्यासाठी सक्ती केली जाते. या एजंटांकडूनही
ठेकेदार कमिशन घेत असल्याचे समजते. भाडेवसुली करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे, तर याठिकाणी सुविधा पुरविण्याची जबाबदारी कोणाची? यावर मात्र कोणीच उत्तर देत नाही.