मेहरबानीवर नव्हे, मेहनतीवर ‘स्मार्ट’ बनू--आमचा पक्ष आमची भूमिका

By Admin | Updated: October 16, 2015 00:12 IST2015-10-15T01:02:51+5:302015-10-16T00:12:14+5:30

लोकमत’शी थेट संवाद साधताना आमदार हसन मुश्रीफ यांचा विश्वास --ताकदीचा अंदाज आल्यानेच भाजप ‘ताराराणी’च्या वळचणीला

Not on mercifulness, but to be a 'smart' on hard work - our role is our role | मेहरबानीवर नव्हे, मेहनतीवर ‘स्मार्ट’ बनू--आमचा पक्ष आमची भूमिका

मेहरबानीवर नव्हे, मेहनतीवर ‘स्मार्ट’ बनू--आमचा पक्ष आमची भूमिका

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच १२५७ कोटींची कामे केल्याचा दावा
राजकीय कुरघोडीमुळेच कोल्हापूरला स्मार्ट सिटीतून वगळल्याचा आरोप
महापालिकेचे शहराजवळ अद्ययावत १०० कोटींचे कार्यालय उभारणार

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांत कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात कधी झाली नाहीत, इतकी १२५७ कोटींची विकासकामे करून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच महापालिकेला ८७ गुण मिळाले. दुर्दैवाने राजकीय कुरघोडीमुळे शहराचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये सहभाग होऊ शकला नाही. आगामी काळात कोणाच्या मेहरबानीवर नाही, तर स्वत:च्या पायावर स्मार्ट सिटीत जाऊ, असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेस-जनसुराज्य आघाडीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार हसन मुश्रीफ यांनी बुधवारी सकाळी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे व आगामी काळातील विकासाचे नियोजन याबाबत भूमिका मांडली.
आमदार मुश्रीफ म्हणाले, राज्याचा मंत्री म्हणून पंधरा वर्षे काम करीत असताना राज्यासह देशभरातील अनेक शहरे पाहण्याची संधी मिळाली. कोल्हापूर शहराचा ज्या पद्धतीने विकास होणे अपेक्षित होते, तो झाला नसल्याने मन उदास व्हायचे. राजर्षी शाहू महाराजांचे कोल्हापूर ‘सुंदर शहर’ म्हणून विकसित व्हावे, यासाठीच आपण महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले. कोल्हापूरच्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचे सोने करीत आम्ही विकासाचा डोंगर उभा केला. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा खूप मोठा वाटा आहे. काळम्मावाडीतून थेट पाईपलाईनने नागरिकांना शुद्ध पाणी देण्यासाठी ४०० कोटी रुपये दिले.‘सुजल निर्माण’ योजनेअंतर्गत १६ कोटींचा निधी दिला.
सांडपाण्यासाठी ‘एसटीपी’च्या माध्यमातून १०० एमएलडी पाण्याचे शुद्धिकरण करण्यात यश मिळविले. अजून ९० एमएलडी सांडपाणी नदीत जाते. त्यासाठी आगामी काळात नियोजन करावे लागणार आहे. भुयारी गटारींची ४७ टक्के कामे पूर्ण झाली असून, ११ प्रमुख नाले बंदिस्त केले आहेत. ‘आयआरबी’च्या माध्यमातून ४९ किलोमीटरचे रस्ते झाले आहेत. ‘नगरोत्थान’मधून १०८ कोटींचे रस्ते केले आहेत. त्याशिवाय जिल्हा नियोजन मंडळ, आमदार निधीतून अंतर्गत रस्ते पूर्ण केल्याने शहरातील बहुतांश रस्ते चकाचक झाले. दलित वस्ती, एकात्मिक झोपडपट्टी योजनेतून ७६१ घरकुले बांधली; पण यामध्ये अपेक्षित काम करू शकलो नाही. आगामी पाच वर्षांत कोल्हापूर शहर झोपडपट्टीमुक्त करीत चांगल्या दर्जाची घरे बांधून देण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. देशात कोठेही नसेल असे न्यायसंकुल व जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ५० कोटींचा निधी मंजूर केला. टेंबलाईवाडी, खोल खंडोबा, पद्मावती मंदिर, केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदान यासाठी कोट्यवधीचा निधी आणून विकास काय असतो, हे दाखवून दिले. अडचणीत आलेल्या के.एम.टी.ला बाहेर काढत नवीन १०४ बसेससाठी केंद्राकडून ४४ कोटी रुपये मंजूर करून घेतले. महापालिकेचे अद्ययावत १०० कोटींचे कार्यालय शहराबाहेर निर्माण चौक किंवा सुभाष स्टोअर्स येथे करण्याचा मानस आहे. जहॉँगीर आर्ट गॅलरी, विरंगुळा केंद्रे, संजय गांधी-श्रावणबाळ योजनांसाठी वेगवेगळी केंद्रे उभाणार आहे. कर न वाढविता विकासाच्या माध्यमातून जनतेची मने जिंकली आहेत. ‘काम करणारा माणूस’ अशीच प्रतिमा असल्याने जनता पुन्हा आम्हाला संधी देईल.

....तर राजकारण सोडेन!
‘ग्रामीण भागातून आल्याने आपणाला ‘टीडीआर,’ टेंडर, आरक्षण, पाकिटात रस नाही. गेल्या दहा वर्षांत महापालिकेचे राजकारण करताना याबाबत एकही बोट आपल्या बाजूने उठल्याचे दाखवा; मी राजकारण सोडेन,’ असे मुश्रीफ यांनी सांगितले.
पदांची खांडोळी ही अपरिहार्यता
गत निवडणुकीनंतर दोन्ही कॉँग्रेसनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यामुळे पदांची खांडोळी ही अपरिहार्यता होती; पण आगामी पाच वर्षांत पाच महापौर, उपमहापौर, स्थायीसह सर्वच सभापती करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

हे केले
रस्ते, गटारी, मूलभूत सुविधांसाठी ५० कोटींची कामे
झोपडपट्टी विकास कार्यक्रम - ४९ कोटी
जिल्हा न्यायसंकुल - ५७ कोटी
विद्यापीठ सुवर्णमहोत्सवानिमित्त - ५० कोटी
‘केएमटी’च्या १०४ नवीन बसेससाठी - ४४ कोटी
थेट पाईप लाईन - ४०० कोटी
सुजल निर्माण योजनेंतर्गत - १६ कोटींची कामे
रंकाळा, केंदाळमुक्त, मार्केट यार्ड, जरगनगर, शाहूपुरी येथे नवीन पाण्याच्या टाक्या
घनकचरा उठावासाठी तीनशे घंटागाड्या
टाकाळा व टोप खण येथे कचरा प्रकल्प

काय करणार
तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची अंमलबजावणी करणार.
पुढच्या वर्षी स्मार्ट सिटी योजनेचे निकष स्वबळावर पूर्ण करणार, शाहू मिल जागेवर राजर्षींचे आंतरराष्ट्रीय स्मारक.
पंचगंगा रुग्णालय, सावित्रीबाई फुले या रुग्णालयांत चांगल्या सुविधा देणार, पाच हजार घरकुले बांधणार.
शहरातील अंतर्गत पाणी वितरण नलिकांचे जाळे विस्तारणार, बांधकाम परवाने आॅनलाईन करणार.
रंकाळा परिसर सुशोभीकरणाची २२३ कोटींची कामे करणार, शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणार,
महापालिकेचे कामकाज सात विभागीय कार्यालयांत विस्तारणार, जहॉँगीर आर्ट गॅलरीच्या धर्तीवर कोल्हापुरात आर्ट गॅलरी उभारणार.




ताकदीचा अंदाज आल्यानेच भाजप ‘ताराराणी’च्या वळचणीला
हसन मुश्रीफ यांची टीका : ढपला संस्कृती ‘ताराराणी’चीच
कोल्हापूर : अठरा वर्षे ‘ताराराणी आघाडी’ने कोल्हापूर शहराच्या विकासाचा खेळखंडोबा केला. ढपलामुक्त महापालिका करायला निघालेल्या मंडळींनीच ढपला संस्कृती आणली असून, ‘टीडीआर’मध्ये घोटाळा व आरक्षित जागा लाटण्यासाठीच भाजप-ताराराणी आघाडीला सत्ता हवी आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. भाजप स्वबळावर लढू शकत नाही, कोल्हापुरात त्यांचे काहीच अस्तित्व नसल्याने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना ताराराणीच्या वळचणीला जावे लागल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
आमदार मुश्रीफ म्हणाले, एकाच सभेत दोनशे आरक्षणे उठविण्याचा भीमपराक्रम ताराराणी आघाडीने केला. त्यांनी महापालिकेत सुरू केलेल्या चुकीच्या संस्कृतीला गेल्या पाच वर्षांत लगाम घालण्याचा प्रयत्न केला. महादेवराव महाडिक हे विकासासाठी प्रसिद्ध नाहीत. त्यांना महापालिकेची सत्ता केवळ मोठेपणासाठी हवी असते. त्यांना वेळ देता येत नसल्याने सत्ता दलालांच्या हातात जाते. त्याचे परिणाम मात्र जनतेला भोगावे लागत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. निवडणुकीसाठी आम्ही पैसे कोठून आणतो, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील विचारतात. हाच प्रश्न आम्हीही त्यांना विचारू शकतो. सत्तेचा उपयोग चांगल्या कामांसाठी करावा. मन मोठे ठेवून मिळालेल्या संधीचे सोने करावे. (पान ८ वर)

पालकमंत्र्यांकडून सुडाचे राजकारण
पालकमंत्री सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जात आहेत. कॉँग्रेसच्या नगरसेविका सरस्वती पोवार यांना छाननी दिवशीच अपात्र केले. छाननीमध्ये त्यांचे पती अडचणीत यावेत, यासाठी हे उपद्व्याप केले. अनेकांना उत्पन्न व जातीचे दाखले मिळू दिले नाहीत. सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे; पण कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. लोकांवर प्रेम केले तरच ते प्रेम देतात, याचे भान ठेवावे, असे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.

जनता मूर्ख की महाडिक शहाणे?
वडील कॉँग्रेसचा आमदार, मुलगा भाजपचा आमदार आणि पुतण्या राष्ट्रवादीचा खासदार, असे महाडिक कुटुंबीयांत आहे. हे पाहिले की जनता मूर्ख की महाडिक घराणे शहाणे हे कळत नाही; पण आता जनतेने विचार करावा, असे सूचक वक्तव्य आमदार मुश्रीफ यांनी केले.

धनंजय महाडिक यांच्याबाबत कार्यकर्त्यांना बोचणी
लोकसभा निवडणुकीत देशात मोदी लाट असताना कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हाडाची काडे, रक्ताचे पाणी करून धनंजय महाडिक यांना खासदार केले. महापालिका निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. ही बोच कार्यकर्त्यांच्या मनात असल्याचे सांगत गेल्या वेळेला खासदार महाडिक आमच्याबरोबर कोठे होते? असा सवाल मुश्रीफ यांनी केला.

Web Title: Not on mercifulness, but to be a 'smart' on hard work - our role is our role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.