विसर्जन नाही; मूर्तिदान !
By Admin | Updated: September 4, 2014 00:06 IST2014-09-04T00:06:24+5:302014-09-04T00:06:51+5:30
घरच्या ‘बाप्पा’ला आज निरोप : पर्यावरणवादी स्वीकारणार गणेशमूर्तींचे दान

विसर्जन नाही; मूर्तिदान !
कोल्हापूर : गेल्या सहा दिवसांपासून मंगलमय तसेच भक्तीमय वातावरणात विराजमान झालेल्या घरगुती गणपतींना उद्या, गुरुवारी सातव्या दिवशी तितक्याच भक्तीमय वातावरणात श्रद्धेने निरोप दिला जाईल. त्यासाठी समस्त कोल्हापूरवासीयांची लगबग सुरू झाली आहे.घरगुती गौरी-गणपती विसर्जनाची लगबग जशी घराघरांत सुरू आहे, तशीच ती विविध स्वयंसेवी संस्था तसेच मनपा प्रशासकीय पातळीवरही आज दिवसभर सुरू होती. दरम्यान, शहरात पंचगंगा नदी अथवा तलावात गणपती मूर्ती, निर्माल्य याचे विसर्जन न करता मनपा कर्मचारी व पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडे दान करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
घरगुती गौरी गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पंचगंगा घाट, रंकाळा तलाव परिसर, कोटीतीर्थ तलाव परिसराची स्वच्छता केली. महापालिकेचे शेकडो कर्मचारी आज दिवसभर त्याकरिता राबत होते. पंचगंगा नदी व रंकाळा परिसरात रस्त्यावर तात्पुरता मुरुम टाकून दुरुस्ती करण्यात आली. रात्रीच्यावेळी विसर्जन सोहळ्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून जादा लाईटस्ची व्यवस्था करण्यात आली आहे. तांबट कमान येथे उभारण्यात आलेल्या विसर्जन कुंडात पाणी कमी होते, परंतु आज टॅँकर तसेच मोटार पंपाच्या साहाय्याने रंकाळा तलावातील पाणी या कुंडात सोडण्यात आले.
तांबट कमान परिसरात मुरुम टाकून सपाटीकरण करण्यात आले. महापालिका प्रशासन व स्वयंसेवी संस्थांकडे निर्माल्य दान झाल्यानंतर ते त्याच दिवशी रात्री ट्रक, ट्रॅक्टर, डंपर्समधून हलविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मूर्तींचे विसर्जन पुन्हा इराणी खणीत करण्यात येणार आहे. मूर्तींची विटंबणा होणार नाही तसेच तलाव, नदी यांचे प्रदूषण होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. या कामासाठी कर्मचाऱ्यांच्या नेमणुकाही करण्यात आलेल्या आहेत.