कायदा मोडणारे नव्हे, पाळणारे सरकार
By Admin | Updated: April 3, 2015 00:38 IST2015-04-03T00:00:59+5:302015-04-03T00:38:18+5:30
‘पी. एन.’ यांच्यावर ‘दादां’चा पलटवार

कायदा मोडणारे नव्हे, पाळणारे सरकार
कोल्हापूर : भाजपमध्ये हम करोसे कायदा नाही. कायदा मोडणारे नव्हे, तर पाळणारे सरकार असल्याने कोणाच्या मनासारखे निर्णय होत नसल्याचा पलटवार सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यावर गुरुवारी केला. ‘गोकुळ’, ‘केडीसीसी’मधील आमच्या ताकदीचा अंदाज असल्याने पारंपरिकांबरोबर जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पी. एन. पाटील यांच्या तक्रारीला प्रत्त्युत्तर दिले. अमल महाडिक हे भाजपचे आमदार आहेत तरीही सहकारमंत्री तुमचे ऐकत नाहीत, असा तक्रारीचा सूर पी. एन. पाटील यांनी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे बुधवारी व्यक्त केला होता. याबाबत मंत्री पाटील यांना विचारले असता, कायद्याप्रमाणे ३० जूनअखेर पात्र सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे. कायद्याप्रमाणे ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. धुळे जिल्हा बॅँकेची निवडणूक लावू नये, असा आमच्या आमदारांचा आग्रह आहे; पण कायद्यानुसार निवडणूक घ्यावीच लागणार आहे.
भाजपमध्ये ‘हम करोसे कायदा नाही, कायदा हवा तसा वाकवला जाईल, असे कोणी गृहीत धरू नये, आम्ही चौकटीत राहून काम करणारी मंडळी आहोत,’ असा टोलाही मंत्री पाटील यांनी हाणला. कॉँग्रेस आघाडीचे सरकार असताना तत्कालीन सहकारमंत्री त्यांच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा देत होते, याबाबत विचारला असता, हाच तर दोन्ही सरकारमधील फरक आहे. भाजप न्यायाच्या बाजूने जात आहे, आम्ही कायदा मोडणारे नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
‘गोकुळ’मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाच उमेदवारी अर्ज दाखल केले. स्वतंत्र पॅनेल करता येण्यासारखी आमची ताकद नाही, याचे भान ठेवून काम करीत आहे. जिल्हा बँकेबाबत पारंपरिक पक्षांच्या बरोबर जाण्याचा विचार असून, कोण बरोबर घेईल त्यांच्याबरोबर जाणार असल्याचेही सांगितले. (प्रतिनिधी)