पाणी योजनेने ‘उत्तर काशी’चे झाले टेंभू!
By Admin | Updated: March 9, 2015 23:44 IST2015-03-09T23:38:43+5:302015-03-09T23:44:21+5:30
पाणी आलं, जमिनी गेल्या : गोपाळ गणेश आगरकरांच्या गावाला मिळाली नवी ओळख--नावामागची कहाणी-दोन

पाणी योजनेने ‘उत्तर काशी’चे झाले टेंभू!
शंकर पोळ - कोपर्डे हवेली -टेंभू गावाची ओळख वेगवेगळ्या टप्प्यावर बदलत गेली. पूर्वी टेंभूला ‘उत्तर काशी’ म्हणून ओळखले जायचे. गोपाळ गणेश आगरकरांचे गाव म्हणून तर सध्या टेंभू योजनेचे गाव म्हणून राज्यात परिचित आहे.
पूर्वेकडे डोंगर तर पश्चिमेकडे कृष्णा नदी़ मधोमध निसर्गरम्य ठिकाणी वसलेले टेंभू गाव. ऐतिहासिक, पौराणिक, स्वातंत्र्याचा इतिहास असणाऱ्या या गावात आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचा बोगदा खणून जिरायती क्षेत्र बागायतीत आणण्याचा प्रयोग यशस्वी झाला़ हजारो हेक्टर जिरायती शेती बागायती झाली; पण त्याची झळ गावातील शेतकऱ्यांना पोहोचली. प्राचीन काळातील सर्व देवदेवतांची मंदिरे गावात आहेत़ मंदिरांची संख्या १२ ते १३ आहे़ काही मंदिरांचा जीर्णोध्दार करण्यात आला आहे़ तर काही मंदिरे मोडकळीस आली आहेत़
पूर्वी या गावात शेतकरी हळदीचे पीक घेत होते़ ब्रिटिश काळामध्ये गावाच्या उत्तर दिशेने कृष्णा कॅनॉल गेल्याने त्याचा लाभ शेजारील शेतजमिनीला झाला. त्यामुळे काही शेती बागायती झाली़ स्वातंत्र्य लढ्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या लेखणीतून ब्रिटिशांवर चौफेर टीका केली़ आगरकरांबरोबरच या गावातील मारूती जगताप, भानुदास कदम, कृष्णत भुसारी, दत्तात्रय कुंभार, खाशाबा मदने आदींचाही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. महात्मा गांधींच्या हत्येनंतर गावातील समाज वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाला़ आगरकरांचे वंशज पुण्यात स्थायिक झाले़
गावाने आगरकरांची आठवण ठेवण्यासाठी त्यांच्या नावाने दिवंगत गोपाळ गणेश आगरकर विद्यालय सुरू केले आहे़ विद्यालयाच्या प्रांगणात आगरकरांचा पुतळा आहे़ टेंभू योजनेचा फायदा झाल्याने गाव १०० टक्के बागायती झाले आहे.
टेंभू गावची सध्याची लोकसंख्या सुमारे ४ हजार आहे़ एकूण ११ ग्रामपंचायतींचे सदस्य निवडून जातात़ ग्रामपंचायतीची निवडणूक नेहमी अटीतटीची होत असते़ सत्ताधारी ६ सदस्य तर विरोधी ५ सदस्य आहेत़
दारूबंदीसाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करूनही गावात दारूबंदी झाली नाही़ ग्रामपंचायतीने ‘निर्मलग्राम’चा पुरस्कार सलग तीनवेळा प्राप्त केला आहे.
...तरीही गावाला तोटाच
टेंभू योजनेचा लाभ शेतीसाठी झाला असला तरी गावाला तोटाही मोठ्या प्रमाणात झाला आहे़ शेतकऱ्यांची ३०० ते ४०० एकर जमीन योजनेत गेली असल्याने शेतकरी भूमिहीन झाले आहेत. शासनाने ज्यांची जमीन गेली, त्यांना शासकीय नोकरीत घेऊ, असे आश्वासन दिले होते ते पूर्ण झाले नाही़ प्रकल्पग्रस्तांचे दाखले काहींना मिळाले तर काहींना मिळाले नाहीत़ १९९५ सालापासून शेतकऱ्यांना शासनाने झुलवत ठेवले आहे़
टेंभू योजनेच्या पाण्यामुळे गाव सुजलाम सुफलाम झाले. या योजनेचे पाणी गावात आले आणि उत्तर काशी म्हणून ओळखले जाणारे गाव आता ‘टेंभू’ या नावाने सर्वत्र परिचित झाले आहे.
- प्रताप सावंत, उपसरपंच, टेंभू