नाकाला रुमाल अन् हातात झाडू
By Admin | Updated: July 5, 2014 01:01 IST2014-07-05T00:58:54+5:302014-07-05T01:01:58+5:30
रंकाळा स्वच्छता मोहीम : महापालिकेच्या साथीला स्वयंसेवी संघटना; पाचशेहून अधिक कर्मचारी राबले

नाकाला रुमाल अन् हातात झाडू
कोल्हापूर : शहराच्या वैभवात भर घालणारा, मात्र अस्वच्छता व कमालीच्या दुर्गंधीच्या गर्तेत सापडलेला रंकाळा परिसर आज, शुक्रवारी महापालिकेसह स्वयंसेवकांच्या हजारो हातांनी राबून एका दिवसात चकाचक केला. गेल्या चार महिन्यांत दर ४५ दिवसांनी राबविण्यात येणारी ही रंकाळा स्वच्छतेची तिसरी मोहीम आज पार पडली.
परिसर स्वच्छ झाला. मात्र, रंकाळ्यातील पाण्याची परिसरात कमालीची दुर्गंधी पसरली आहे. नाकाला रुमाल लावूनच कर्मचाऱ्यांनी रंकाळ्याची स्वच्छता केली. बाह्य परिसर स्वच्छतेबरोबरच रंकाळ्याच्या अंतर्गत स्वच्छतेसाठी ठोस उपाय योजण्याची मागणी रंकाळाप्रेमींतून होत आहे.
सकाळी आठच्या सुमारास महापौर सुनीता राऊत यांच्या हस्ते मोहिमेस सुरुवात झाली. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, नगरसेवक राजू लाटकर, शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक अजित राऊत, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त संजय हेरवाडे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, आदींसह स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते, व्हाईट आर्मीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छता मोहिमेसाठी महापालिकेच्या आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा, अतिक्रमण, बांधकाम, उद्यान, आदी विभागांतील किमान पाचशेहून अधिक कर्मचारी याकामी तैनात करण्यात आले होते.
रंक ाळ्याची चारही बाजूंनी दुर्दशा होऊ लागली आहे. सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळून दरवर्षी विषारी जलपर्णीचा वेढा पडतो. रंकाळ्याचे पाणी हिरवे झाले आहे. संपूर्ण परिसरात मैल्याची दुर्गंधी पसरली आहे. कधी काळी निवांत सुखद क्षण घालविण्याचा अनुभव देणारा रंकाळा आज दुर्गंधीमुळे नकोसा झाला आहे. कमालीच्या दुरवस्थेमुळे कोल्हापूरचे वैभव असलेले रंकाळा हे ऐतिहासिक पर्यटनस्थळ शेवटच्या घटका मोजत आहे. महापालिकेने पर्यावरण संघटनांच्या मदतीने सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत रंकाळा परिसराची स्वच्छता केली. रंकाळा उद्यान, पदपथ, बगिचा, बाजूचा रस्ता, झाडी, कठडे, आसनव्यवस्था साफ केली. झाडा-झुडपांभोवती औषध फवारणी करण्यात आली.पदपथावर उगवलेली खुरटी वनस्पती साफ करण्यात आली. बगिच्यामध्ये साचलेला पाला काढून उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी झुडपांची कटाई केली. अग्निशामक दलाच्या बंबाद्वारे पाणी मारून अनेक टॉवरची स्वच्छता करण्यात आली. (प्रतिनिधी)