‘अशासकीय’चे शेपूट वाढणार
By Admin | Updated: August 19, 2014 23:37 IST2014-08-19T23:20:00+5:302014-08-19T23:37:06+5:30
बाजार समिती : १६वा सदस्य म्हणून राधानगरीच्या राजेंद्र भाटले यांची नेमणूक ?

‘अशासकीय’चे शेपूट वाढणार
राजाराम लोंढे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाची सदस्य संख्या वाढू लागली आहे. गेले आठ-दहा दिवस याबाबत जिल्ह्यातील नेत्यांमध्ये खलबते सुरू होती, अखेर आज, मंगळवारी एस.टी. महामंडळाचे संचालक ए. वाय. पाटील यांनी राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या निवडीचे पत्र आणल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. कार्यकर्त्यांची सोय करण्याच्या नादात बाजार समितीचे ‘आदान’ मात्र लांबणार, हे मात्र निश्चित आहे.
संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे बाजार समितीवर प्रशासक आले. गेले दहा महिने प्रशासकांनी समिती प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. समितीचा खर्च कमी झाल्याने सहा महिन्यांत उत्पन्न वाढत गेले; पण दोन्ही कॉँग्रेसने निवडणुकीच्या तोंडावर आपल्या कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठी प्रशासकांना हटवून अशासकीय प्रशासक मंडळ आणले.
दोन्ही कॉँग्रेसपैकी बाजार समितीवर ज्याची सत्ता होती, त्यांना सात जागा आणि दुसऱ्याला सहा जागा द्यायचा हा फार्म्युला राज्य पातळीवर ठरला होता. त्यानुसार कोल्हापूर बाजार समितीवर राष्ट्रवादी-जनसुराज्य-शेकापची सत्ता होती. विरोधी कॉँग्रेसचे दोन सदस्य होते. त्यामुळे येथे राष्ट्रवादीला सात व काँग्रेसला सहा जागा मिळणे अपेक्षित होते; पण राष्ट्रवादीने नऊ जागा घेत कॉँग्रेसला सहा दिल्या. यामध्ये करवीर, भुदरगड, पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी व कोल्हापूर शहर अशा प्रत्येक एक जणांची वर्णी लावली. कागल तालुक्यातून दोन सदस्य दिले. एक जागा जनसुराज्य पक्षाला दिली; पण यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राधानगरी तालुक्याला प्रतिनिधित्वच दिले नाही. संचालक मंडळात राधानगरीचे दोन संचालक होते. उलट सहा जागा असतानाही कॉँग्रेसने राधानगरीला प्रतिनिधित्व दिले. याची सल एस. टी. महामंडळाचे संचालक ए. वाय. पाटील यांना गेले दहा-बारा दिवस बोचत होती. या विषयीची नाराजी त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ व आमदार के. पी. पाटील यांच्याकडे बोलून दाखविली होती. एस.टी.महामंडळ संचालक पदाचा आणि या नेमणुकीचा काही संबंध नसल्याचे सांगत ए. वाय. पाटील यांनी आणखी एक प्रतिनिधित्वाचा हट्ट धरला. अखेर आज राजेंद्र भाटले (हुडा-राधानगरी) यांची नेमणूक केल्याचे सूत्रांकडून समजते.
‘शेकाप’ नाराज!
बाजार समिती, केडीसीसी, गोकुळसह सर्वच निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचा जनसुराज्य व शेकाप हे पारंपरिक मित्र पक्ष आहेत. बाजार समितीच्या सत्तेत ‘शेकाप’चा एक संचालक होता; पण अशासकीय मंडळात राष्ट्रवादीने जनसुराज्यला संधी दिली, पण ‘शेकाप’ला डावलल्याची भावना कार्यकर्त्यांत आहे.
कॉँग्रेसही आक्रमक ?
मुळात राष्ट्रवादीने तीन जागा जास्त घेतल्या आहेत. त्यात आणखी एक सदस्य वाढविल्याने कॉँग्रेसचे नेतेही आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशासकीय समितीची ही शेपूट आणखी वाढण्याची शक्यता आहे.