बिगर हंगामी ऊस लागण करू नये : गणपतराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST2021-06-23T04:16:45+5:302021-06-23T04:16:45+5:30
बुबनाळ : ऊस उत्पादक शेतक-यांनी ऊसाचे एकरी शंभर ते दीडशे टन उत्पादन घेण्यासाठी १५ जुलै ते १५ आॅगस्ट ...

बिगर हंगामी ऊस लागण करू नये : गणपतराव पाटील
बुबनाळ : ऊस उत्पादक शेतक-यांनी ऊसाचे एकरी शंभर ते दीडशे टन उत्पादन घेण्यासाठी १५ जुलै ते १५ आॅगस्ट या काळातच आडसाली लागण करणे फायदेशीर आहे. जून महिन्यात बिगर हंगामी ऊस लागण करू नये. निव्वळ ऊसाला लवकर तोड मिळते म्हणून जमिनीची सुपिकता नष्ट करू नका, असे आवाहन दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले.
औरवाड-बुबनाळ क्षारपड जमीन सुधारणा पाहणी कार्यक्रमात अध्यक्ष पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी औरवाडचे सरपंच अशरफ पटेल होते. अध्यक्ष पाटील पुढे म्हणाले, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जूनमध्ये जर लागण केली तर उसाला तुरा येण्याची शक्यता असते. त्यामुळे उसाची वाढ थांबते. परिणामी वजन कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे शेतक-यांना साखर कारखान्यांना लवकर ऊस गाळप करण्याची विनंती करावी लागते. उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात घट येते व शेतक-यांचे आर्थिक नुकसान होते. म्हणून शेतक-यांनी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या कालावधीमध्ये आडसाली ऊस लागण करणे शेतक-यांच्या हिताचे आहे.
यावेळी भय्या पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, जयवंत कोले, शमशुद्दीन पटेल, सुभाष शहापुरे, मुस्ताक पटेल, अनिल आगरे, संजय कोले, विजय सूर्यवंशी यांच्यासह उपस्थित होते.
फोटो - २२०६२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - औरवाड (ता. शिरोळ) येथील क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमप्रसंगी दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, अशरफ पटेल, भय्या पाटील, श्रीशैल हेगाण्णा, जयवंत कोले उपस्थित होते.