अशासकीय मंडळाने घेतला ताबा
By Admin | Updated: November 13, 2014 00:41 IST2014-11-13T00:37:36+5:302014-11-13T00:41:53+5:30
शेती उत्पन्न बाजार समिती : विभागांचा घेतला आढावा; उपनिबंधकांच्या भूमिकेकडे लक्ष

अशासकीय मंडळाने घेतला ताबा
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचा ताबा अशासकीय मंडळाने आज, बुधवारी पुन्हा घेतला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सर्व १९ सदस्यांनी एकत्र बैठक घेतली. बाजार समितीच्या सभागृहातील बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला. यामुळे ‘प्रशासक’ म्हणून नियुक्त केलेले डॉ. महेश कदम यांनी पाहत असलेला कारभार रीतसर की, अशाकीय मंडळ चालवीत असलेले कामकाज रीतसर, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यामुळे बाजार समितीच्या अधिकारी, कर्मचारी यांना आपला ‘साहेब’ कोण हे कळत नसल्यामुळे प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी बाजार समितीच्या दैनंदिन कामकाजातील महत्त्वाचे निर्णय घेण्याला मर्यादा आल्या आहेत.
पणन संचालकांनी बाजार समितीचे प्रशासक डॉ. महेश कदम यांना हटवून सुरुवातीला अशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती. १५ जणांच्या अशासकीय मंडळाची संख्या १९ पर्यंत पोहोचली. याविरोधात तक्रार झाल्यानंतर ८ आॅगस्ट २०१४ रोजी जिल्हा उपनिबंधकांनी अशासकीय मंडळाच्या केलेल्या नेमणुकीस पणनचे संचालक डॉ. सुभाष माने यांनी अंतरिम स्थगिती शुक्रवारी (दि. ७) दिली. अंतरिम स्थगिती आदेशाच्या विरुद्ध माजी चेअरमन आर. के.पोवार, व्हाईस चेअरमन प्रा. निवास पाटील, सदस्य एम. पी. पाटील, सत्यजित जाधव, आदी अशासकीय मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने पणनच्या संचालकांच्या आदेशाला स्थगिती दिली. यामुळे बाजार समितीच्या कारभाराबद्दल पेच निर्माण झाला आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालय म्हणते, आम्हाला रीतसर अजून न्यायालयाचे आदेश आलेले नाहीत. यामुळे बाजार समितीवरील प्रशासक कायम आहे. अशासकीय मंडळ म्हणते, उच्च न्यायालयाने स्थगितीचा आदेश दिल्यामुळे बाजार समितीचा कामकाज पाहण्याचा मार्ग खुला झाला आहे. यामुळे सध्या बाजार समितीचा कारभार अशासकीय मंडळाकडे की, प्रशासकांकडे, असा गुंता निर्माण झाला आहे. जिल्हा उपनिबंधकही यामध्ये ठोस अशी आपली भूमिका अध्याप स्पष्ट करीत नसल्याचे चित्र आहे.
अशासकीय मंडळातील प्रा. निवास पाटील यांनी स्थगितीचा आदेश झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांना मोबाईलवरून माहिती दिल्याचे सांगतात, तर जिल्हा उपनिबंधक मला अजूनही रीतसर आदेशाचे पत्र मिळाले नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगत आहेत.(प्रतिनिधी)
पणन संचालकांनी दिलेल्या आदेशाची माहिती उपनिबंधक शिरापूरकर यांना दिले आहेत. त्यांना आदेशाची प्रत हवी असल्यास इंटरनेटवर उपलब्ध होऊ शकते. आम्ही प्रत नेऊन देणार नाही. उच्च न्यायालयानेच स्थगिती दिल्यामुळे बाजार समितीमध्ये कामकाज करण्याचा मार्ग खुला झाला. म्हणून आज अशासकीय मंडळातील १९ जण येऊन बैठक घेतली. कामकाज पाहिले. आम्हाला कोणीही अडविले नाही. प्रशासक फिरकलेही नाहीत.
- प्रा. निवास पाटील, माजी व्हाईस चेअरमन, बाजार समिती
उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाची प्रत मला मिळालेली नाही. त्यामुळे अद्याप पुढील कार्यवाही केलेली नाही. बाजार समितीच्या कामकाजाची सूत्रे प्रशासक डॉ. महेश कदम यांच्याकडेच आहेत. अशासकीय मंडळाकडे दिलेली नाहीत.
- सुनील शिरापूरकर, जिल्हा उपनिबंधक