नोटा रद्द निर्णयाचा गुळ बाजारावर परिणाम नाही
By Admin | Updated: November 10, 2016 15:19 IST2016-11-10T15:19:04+5:302016-11-10T15:19:04+5:30
केंद्र शासनाने 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयाचा कोल्हापुरातील गुळाच्या बाजारावर परिणाम झालेला नाही. हा व्यवहार चेकच्या माध्यमातून होत असल्याने आवक सुरळीत आहे

नोटा रद्द निर्णयाचा गुळ बाजारावर परिणाम नाही
ऑनलाइन लोकमत / विश्वास पाटील
कोल्हापूर, दि. 10 - केंद्र शासनाने 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयाचा कोल्हापुरातील गुळाच्या बाजारावर परिणाम झालेला नाही. हा व्यवहार चेकच्या माध्यमातून होत असल्याने आवक सुरळीत आहे. पण, अजून गुळ आवक कमी असल्याचे दिसत आहे.
नोव्हेंबर उजाडला की कोल्हापुरात गु-हाळे सुरू होतात. पिवळाधम्मक जीभेला पाणी सुटायला लावणारा गुळ ट्रॉलीत भरून येथील मार्केट यार्डमध्ये यायला सुरुवात होते. गुरुवारी पाच आणि दहा किलोचे 30 हजार रव्यांची (भेली) यार्डात आवक झाली. एक किलोच्या छोट्या वड्यांची पाच हजार बॉक्सची आवक झाली. त्याचा क्विंटलचा दर 3,800 रुपये इतका तर पाच किलोच्या रव्यांचा दर 3,600 रुपये इतका होता.
यंदा ऊस कमी असल्याने गुळाचे उत्पादनही कमी होणार हे माहित असल्याने सुरुवातीपासूनच दर चढे आहेत, पण, तुलनेत अजून आवक सुरू झालेली नाही. हंगाम पूर्ण तेजीत असतो तेव्हा दिवसाला सरासरी 30 किलोच्या 60 हजार रव्यांची आवक होते.
गुळाची पैसे देण्याच्या व्यवहाराला ‘पट्टी दिली’ असे म्हटले जाते. ही रक्कम जास्त असल्याने अडत्यांकडून शेतक-याला चेकच्या माध्यमातूनच ती अदा केली जाते. बरेच शेतकरी पावसाळ्यातही उचल घेतात त्यामुळे सुरुवातीला त्या पैशाच्या परतफेड करण्याचाच व्यवहार सुरु असतो.
अडत्या व शेतकरी यांचे नाते वषानुवर्षाचे असते. त्यामुळे पैसे कुठे जात नाहीत, अशी भावना असल्याने रोजच्या पैशासाठी तगादा नसतो. त्यामुळेच पाचशेच्या नोटा रद्द झाल्यातरी बाजार समितीतील व्यवहारावर फारसा परिणाम झाला नसल्याचे गुळ विभागाच्या के. बी. पाटील यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
गुळाइतकाच कोल्हापूर मार्केटमध्ये कांदाही मोठ्या प्रमाणावर येतो. रोज प्रत्येकी सहा टन काद्यांचे किमान 20 ट्रक आवक होते. हा कांदा अहमदनगर जिल्ह्यांतील श्रीगोंदा तालुक्यातून होते. परंतु तिथेही शेतकरी व व्यापारी यांचे ओळखीचे संबंध असल्याने पैसे देण्यावरून फारशा अडचणी आल्या नाहीत. कोल्हापूरला शेजारच्या कर्नाटकातून रोज 25 हून अधिक ट्रक भाजीपाला येतो. तिथे मात्र काही प्रमाणात सुट्या पैशांवरून वादावादी झाली. परंतु काही व्यापा-यांनी गुरुवारपासून 500 रुपयांच्या नोटा स्वीकारायला सुरुवात केली.