सबसिडी नको, धान्यच मिळाले पाहिजे
By Admin | Updated: February 25, 2015 00:03 IST2015-02-24T23:55:19+5:302015-02-25T00:03:55+5:30
कोल्हापुरात विराट मोर्चा : सर्वसामान्य महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर ; यापुढच्या काळात व्यापक लढ्याचा इशारा

सबसिडी नको, धान्यच मिळाले पाहिजे
कोल्हापूर : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रोख सबसिडी नको तर अन्न सुरक्षा कायद्यानुसार सर्वांना पुरेसे धान्य मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी मंगळवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. येथील रेशन बचाव समितीने आयोजित केलेल्या मोर्चात सुमारे दहा हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते, महिलांचा मोठ्या संख्येने समावेश होता. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या अलीकडील काळात निघालेला हा सर्वांत मोठा मोर्चा होता.
मिरजकर तिकटी येऊन दुपारी साडेबारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, महानगरपालिका, आईसाहेब महाराज पुतळा, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉनर्रमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. भरउन्हात मोर्चा निघूनही मोर्चेकऱ्यांचा उत्साह कमालीचा होता. कोल्हापूर, इचलकरंजी शहरांसह जिल्ह्णातील ४०० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील महिला-पुरुष मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
मोर्चासमोर भाषणात वक्त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केलीच, शिवाय जनतेचा हा धान्य मागणीसाठीचा लढा यापुढच्या काळातही व्यापक प्रमाणात आंदोलन करून लढू, असा गंभीर इशारा दिला. रेशन बचाव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी जनतेची कदर न करणारे हे सरकार असल्याचा आरोप केला. जर छत्तीसगड, बंगाल, त्रिपुरा, कर्नाटक, मिझोराम यासह अनेक राज्यांत जर रेशन धान्य दुकानांतून विविध प्रकारचे धान्य दिले जात असेल तर मग महाराष्ट्रात का नाही, असा सवाल करत केंद्रात व राज्यात सत्तांतर झाले आणि पहिला फटका सर्वसामान्यांना बसला. अनेक जिल्ह्यात धान्य पोहोचले नाही. चार महिन्यांपासून केशरी कार्डधारकांनाही धान्य मिळालेले नाही.
‘अच्छे दिन येणार’ असल्याचे सांगून सत्तेवर आलेल्यांनी आता सर्वसामान्य जनतेचा धोक्याचा इशारा समजावा, असे यादव म्हणाले.
विद्यमान सरकार हे गरीब जनतेच्या जिवाशी खेळत असल्याचा घणाघात राज्य संघटनेचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी केला. जोपर्यंत अंत्योदय योजनेद्वारे ३५ किलो धान्य, एपीएल कार्डधारकांना माणसी १० किलो धान्य मिळत नाही आणि रॉकेल कोटा वाढवून मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.
आॅल इंडिया संघटनेचे अध्यक्ष काका देशमुख यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. ज्यांना कुटुंबच नाही त्या पंतप्रधानांना कुटुंबाची व्याख्या आणि समस्या काय माहीत, असा सवाल यावेळी काका देशमुख यांनी केला.
गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्यांसह सर्वांना माणसी चार लिटर रॉकेल दिले पाहिजे, अशी मागणीही केली. या मोर्चात रवींद्र मोरे, शौकत महालकरी, नामदेव गावडे, सतीश कांबळे, नगरसेवक राजू पसारे, संगीता देवेकर, सविता संकपाळ आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)