ना वर्गणी, ना थाटमाट, यंदाचा गणेशोत्सव आरोग्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:16 IST2021-07-01T04:16:48+5:302021-07-01T04:16:48+5:30
कोल्हापूर : आधी महापूर आणि गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तरुण मंडळांनी सलग तिसऱ्या ...

ना वर्गणी, ना थाटमाट, यंदाचा गणेशोत्सव आरोग्यासाठी
कोल्हापूर : आधी महापूर आणि गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तरुण मंडळांनी सलग तिसऱ्या वर्षी आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्गणी मागणार नाही, थाटमाट आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत रक्तदान शिबिर, लसीकरण, कोरोना योद्ध्यांचा सन्मान अशा आरोग्यदायी उपक्रमांवर भर देण्याचा निर्धार मंडळांनी व्यक्त केला.
राज्य शासनाने मंगळवारी गणेशोत्सव साधेपणाने व कोरोना निर्बंधांचे पालन करत करण्याचे आदेश काढले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील गणेश मंडळांचे नियोजन काय असणार आहे हे ‘लोकमतच्या’वतीने जाणून घेण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरातील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या रूपातील आकर्षक गणेशमूर्ती, सजीव आणि तांत्रिक देखावे हे या उत्सवाचे खास वैशिष्ट्ये. मात्र, २०१९ मध्ये महापूर आणि गेल्या वर्षी कोरोनामुळे कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झालेला नाही. आता तिसऱ्या वर्षीही अजून जिल्ह्याला कोरोनाचा विळखा आहे. शिवाय तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे व्यवसाय, पर्यटन असे सगळे व्यवहार बंद असल्याने नागरिकांची क्रयशक्ती कमी होऊन आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहेत.
या सामाजिक आणि आर्थिक अडचणींच्या काळात तरुण मंडळांनी कोणताही थाटमाट न करता अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांकडे वर्गणी मागितली जाणार नाही. तसेच गणेशमूर्तीची उंची ४ फुटांच्या आत असणार असून, मांडवात केवळ धार्मिक विधी पार पाडले जाणार आहेत.
--
काेरोनामुळे आता सामाजिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे यावर्षी वर्गणी मागणार नाही. कार्यकर्त्यांच्यावतीनेच जो काही निधी गोळा होईल त्यातच उत्सव साजरा केला जाईल. मंडळाचा देखावा असणार नाही. लहान मांडवात देवाचे धार्मिक विधी पाडले जातील. गर्दी होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत.
-कपिल चव्हाण, राधाकृष्ण तरुण मंडळ
--
मंडळाकडून गेली तीन वर्षे गणेशोत्सव साजरा झालेला नाही. या वेळी कार्यकर्त्यांची इच्छा खूप होती. मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा; पण शासनाने घालून दिलेल्या निर्णयानुसार उत्सव होईल. शिवाय दोन महिन्यांनंतर शहरात कोरोनाची काय स्थिती असेल यावर सगळं अवलंबून असणार आहे.
-गजानन यादव, लेटेस्ट तरुण मंडळ
-
गणेशोत्सवासाठी आम्ही कधीच वर्गणी गोळा करत नाही. आता तर कोरोनाचे संकट आहे. गेल्यावर्षी आम्ही कोरोना योद्ध्यांचा सत्कार, रक्तदान शिबिर असे उपक्रम घेतले होते. यंदा लसीकरणासाठी प्रयत्न करत आहाेत.
-गणेश पाटील, डांगे गल्ली तरुण मंडळ
--
सण, उत्सवांवर अर्थकारण अवलंबून असते. त्यामुळे शासनाने आता सगळे व्यवहार व मंदिरे सुरू करावीत. तसेच उत्सवांवर फार बंधने घालू नयेत. कोरोनाच्या धर्तीवर सगळ्यांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहेच; पण त्याचा अतिरेक होऊ नये अशी अपेक्षा आहे.
-अजित सासणे, संभाजीनगर तरुण मंडळ
---