गुळाच्या उलाढालीवर परिणाम नाही

By Admin | Updated: November 11, 2016 00:14 IST2016-11-10T23:15:14+5:302016-11-11T00:14:31+5:30

कोल्हापूर मार्के ट : चांगला दर, परंतु आवक कमी

No result on the turnover | गुळाच्या उलाढालीवर परिणाम नाही

गुळाच्या उलाढालीवर परिणाम नाही

विश्वास पाटील -- कोल्हापूर -केंद्र शासनाच्या नोटा रद्दच्या निणर्याचा येथील गुळाच्या बाजारावर परिणाम झालेला नाही. हा व्यवहार चेकच्या माध्यमातून होत असल्याने आवक सुरळीत आहे; परंतु अजून गूळ आवकेने जोर पकडलेला नाही.
नोव्हेंबर उजाडला की कोल्हापुरात गुऱ्हाळे सुरू होतात. पिवळाधमक जीभेला पाणी सुटायला लावणारा गुळ ट्रॉलीत भरून येथील मार्केट यार्डामध्ये यायला सुरुवात होते. गुरुवारी पाच आणि दहा किलोंच्या ३० हजार रव्यांची (भेली) यार्डात आवक झाली. तसेच एक किलोच्या छोट्या वड्यांची पाच हजार बॉक्सची आवक झाली. त्याचा क्ंिवटलचा दर ३८०० रुपये इतका, तर पाच किलोंच्या रव्यांचा दर ३६०० रुपये इतका होता.
यंदा ऊस कमी असल्याने गुळाचे उत्पादनही कमी होणार हे माहीत असल्याने सुरुवातीपासूनच दर चढे आहेत; परंतु तुलनेत अजून आवक
सुरू झालेली नाही. हंगाम पूर्ण
तेजीत असतो तेव्हा दिवसाला सरासरी ३० किलोंच्या ६० हजार रव्यांची आवक होते.
गुळाचे पैसे देण्याच्या व्यवहाराला ‘पट्टी दिली’ असे म्हटले जाते. ही रक्कम जास्त असल्याने अडत्यांकडून शेतकऱ्याला चेकच्या माध्यमातूनच ती अदा केली जाते. बरेच शेतकरी पावसाळ्यातही उचल घेतात. त्यामुळे सुरुवातीला त्या पैशांची परतफेड करण्याचाच व्यवहार सुरू असतो. अडत्या व शेतकरी यांचे नाते वर्षानुवर्षाचे असते. त्यामुळे पैसे कुठे जात नाहीत, अशी भावना असल्याने रोजच्या पैशांसाठी तगादा नसतो. त्यामुळेच पाचशेच्या नोटा रद्द झाल्या तरी मार्केट कमिटीतील व्यवहारावर त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे गूळ विभागाच्या के. बी. पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
गुळाइतकाच कोल्हापूर मार्केटमध्ये कांदाही मोठ्या प्रमाणावर येतो. रोज प्रत्येकी सहा टनांचे किमान २० ट्रकची आवक होते. हा कांदा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून येतो; परंतु तिथेही शेतकरी व व्यापारी यांचे ओळखीचे संबंध असल्याने पैसे देण्यावरून फारशा अडचणी आल्या नाहीत.
कोल्हापूरला शेजारच्या कर्नाटकातून रोज २५ हून जास्त ट्रक भाजीपाला येतो. तिथे मात्र काही प्रमाणात सुट्या पैशांवरून वादावादी झाली; परंतु काही व्यापाऱ्यांनी गुरुवारपासून ५०० रुपयांच्या
नोटा स्वीकारायला सुरुवात केली. त्यामुळे सौदे काढण्यास कांही वेळ उशीर झाला.

Web Title: No result on the turnover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.