ना संगीत... ना बाजा... फक्त मोरयाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST2021-09-11T04:25:33+5:302021-09-11T04:25:33+5:30

कोल्हापूर : विघ्नहर्त्या गणरायाचे स्वागत करताना शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोना संसर्ग वाढणार नाही याचे सामाजिक भान जपत ना ...

No music ... no music ... just peacock alarm | ना संगीत... ना बाजा... फक्त मोरयाचा गजर

ना संगीत... ना बाजा... फक्त मोरयाचा गजर

कोल्हापूर : विघ्नहर्त्या गणरायाचे स्वागत करताना शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोना संसर्ग वाढणार नाही याचे सामाजिक भान जपत ना संगीत, ना बाजा अन् फक्त ‘मोरया... मोरया’चा गजर करत गणेशमूर्ती आणून मंडपात प्रतिष्ठापना केली. एवढा मोठा उत्सव असूनही प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत राजारामपुरीसह सर्वच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बाप्पांचे आगमन व स्वागत अत्यंत साधेपणाने केले.

सलग दुसऱ्या वर्षी शहरातील गणेशोत्सवावर कोरोना संसर्गाचे सावट आहे. सध्या साथ कमी असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचा इशारा राज्य शासनाने दिला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक तसेच साध्या पद्धतीने करा, असे आवाहन जिल्हा, तसेच महापालिका प्रशासनाने केले आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाचे कार्यकर्ते प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देणार की नाही, याबाबत उत्सुकता होती; परंतु कोरोनासारख्या महामारीच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विधायक भूमिका घेत सार्वजनिक मिरवणुका काढण्याचे टाळले.

शहरातील ए, बी, सी, डी व ई वाॅर्डांतील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचे ठरविले आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी बाप्पांच्या आगमनाचा झगमगाट, वाद्यांचा गोंगाट, संगीताचा कर्णकर्कश आवाज आणि गर्दीत हरविणाऱ्या मिरवणुका या सगळ्यांना कार्यकर्त्यांनी फाटा दिला. कोणत्याही मंडळांनी मूर्ती नेताना रस्त्यावर वाद्य आणले नाही. संगीताचा ठेका साउंड सिस्टमवर लावला नाही. विद्युत रोषणाईचा झगमगाट केला नाही. केवळ ‘मोरया... मोरया’चा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया’चा अखंड जयघोष केला. विशेष म्हणजे गणपतीची मूर्ती नेताना कार्यकर्त्यांनी गर्दी टाळण्याचे भानसुद्धा जपले. अगदी मोजके कार्यकर्ते मूर्ती नेण्यासाठी कुंभार गल्लीत गेले होते. लहान मुलांचा उत्साह आणि गलगलाट हाच काय तो मिरवणुकीतील जल्लोष होता.

-राजारामपुरीत मोठा बंदोबस्त; पण आगमन शांततेत

राजारामपुरी सर्वच गल्लीतील मंडळांनी यंदा कसलीही ईर्षा केली नाही. प्रत्येक वर्षी आगमनाची मिरवणूक मोठ्या प्रमाणात व दणकेबाज वातावरणात काढण्याचा कार्यकर्त्यांचा उत्साह असतो; परंतु यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांतता होती. मंडळांचे मोजके कार्यकर्ते ट्रॅक्टर, ट्रॉलीतून मूर्ती आणण्यासाठी बाहेर पडले होते. कोणत्याही वाद्यांशिवाय, गोंगाटाशिवाय मूर्ती शांततेत पण भक्तिभाव जोपासत मूर्तींची प्रतिष्ठापना केली. राजारामपुरीत जनता बझार चौक ते मारुती मंदिर या मार्गावर वाहने सोडली जात नव्हती. मारुती मंदिरकडून वाहने सोडली जात होती.

जरी मिरवणुका काढण्याचे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी टाळले असले तरी रस्त्यावर पोलीस बंदोबस्त मात्र मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला होता. शहराच्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर तसेच कुंभार गल्लीतून तसेच बापट कॅम्प परिसरात पोलीस वाहतूक सुरळीत करण्यावर जोर देत होते. राजारामपुरी जनता बझार चौक येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, प्रमोद जाधव, शशिराज पाटोळे आदी वरिष्ठ अधिकारी ठाण मांडून बसले होते.

Web Title: No music ... no music ... just peacock alarm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.