अजून निरोप नाही, निरोप आल्यानंतर पाहू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:25 IST2021-05-09T04:25:22+5:302021-05-09T04:25:22+5:30
कोल्हापूर : ‘गोकुळ’ची सत्ता हस्तगत केल्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी बदलाचे वेध इच्छुकांना लागले आहेत. परंतु, सत्तेत सहभागी असलेल्या ...

अजून निरोप नाही, निरोप आल्यानंतर पाहू
कोल्हापूर : ‘गोकुळ’ची सत्ता हस्तगत केल्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी बदलाचे वेध इच्छुकांना लागले आहेत. परंतु, सत्तेत सहभागी असलेल्या नेत्यांना अजूनही निरोप दिले गेले नसल्याने ‘निरोप आल्यानंतर पाहू’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांना दिलेली वर्षभराची मुदत जानेवारीतच संपली आहे; परंतु ‘गोकुळ’साठी थांबलेल्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक शशिकांत खोत आणि अमर पाटील यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. या दोघांनी शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील यांची आणि शनिवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांना ४२ सदस्य आपल्यासोबत ठाम असल्याचे सांगितले.
आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील, माजी खासदार राजू शेट्टी हे ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याविरोधी आघाडीत एकत्र होते. त्यामुळे त्यांची भूमिका काय राहणार याबाबत तिघांशीही संपर्क साधल्यानंतर ‘अजून याबाबत कोणाचाही निरोप आलेला नाही. निरोप आल्यानंतर पाहू’, अशी भूमिका जाहीर केली आहे.
आमदार पी. एन. पाटील म्हणाले, सहकारामध्ये पक्ष म्हणून निवडणूक लढवली जात नाही; परंतु आम्ही पक्षाच्या विरोधात कधी काम केले नाही. गेल्यावर्षीही बहुमताअभावी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसकडून जाईल, असा निरोप सतेज पाटील यांनी दिल्यानंतर आमचे सर्व सदस्य उपस्थित राहिले. त्यामुळे जेव्हा याबाबत निरोप येईल त्यावेळी बघू.
माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले, आमची शिवसेनेची बैठक अजून झालेली नाही. बैठकीबाबत अजून ठरलेले नाही. ती ठरल्यानंतर आम्ही सर्व शिवसेना नेते बसून निर्णय घेऊ.
चौकट
वेट अँड वॉच
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, आम्हाला निरोप आलेला नाही. तो आल्यानंतर पाहू. तोपर्यंत ‘वेट अँड वॉच’ या भूमिकेत आम्ही आहोत, असे त्यांनी सांगितले.