दायित्वचा फलक नाही..ठेकेदारांना नवीन काम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:29 IST2021-09-17T04:29:40+5:302021-09-17T04:29:40+5:30
कोल्हापूर : शहरात केलेल्या रस्त्यांवर दायित्व कालावधी दर्शवणारे फलक उभारणी न करणाऱ्या ठेकेदारांना नवीन रस्त्यांची कामे देऊ नयेत ...

दायित्वचा फलक नाही..ठेकेदारांना नवीन काम नाही
कोल्हापूर : शहरात केलेल्या रस्त्यांवर दायित्व कालावधी दर्शवणारे फलक उभारणी न करणाऱ्या ठेकेदारांना नवीन रस्त्यांची कामे देऊ नयेत तसेच शहरात निर्माण झालेले अशास्त्रीय स्पीडब्रेकर तातडीने हटवावे, अशी मागणी परिख पूल नूतनीकरण समिती व विविध सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्यावतीने गुरुवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.
रस्त्यांचा दर्जा वाहन क्षमता तसेच विविध अवजड वाहतुकीनुसार असावे, ठेकेदार गॅरंटीनुसार खराब रस्त्यांची दुरुस्ती केल्याशिवाय त्यास पुढील कंत्राट देऊ नये, नवीन रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच इतर खड्ड्यांची संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित व्हावी, अशास्त्रीय स्पीडब्रेकर्स हटवण्यात यावीत किंवा दुरुस्त करून त्यावर थर्मल प्लास्टरिंग अथवा रिफ्लेक्टर बसवावेत, रस्ता बाजूपट्ट्या करणे बंधनकारक करावे, अशा मागण्या बलकवडे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
रस्त्यावर थुंकणाऱ्या, घाण करणाऱ्यांवर दंडाची कारवाई व्यापक करावी तसेच यासाठी प्रबोधन करणाऱ्या चळवळींचाही सहभाग आवश्यक वाटल्यास करुन घ्यावा, अशी सूचना यावेळी करण्यात आली. प्रशासकांना भेटलेल्या शिष्टमंडळात फारुक शेख, संजय घाटगे, वंदूरकर, सचिन पाटील यांचा समावेश होता.
फोटो क्रमांक - १६०९२०२१-कोल-निवेदन
ओळ - कोल्हापुरातील परिख पूल नूतनीकरण समिती व विविध सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्यावतीने गुरुवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.