आरोग्यासंदर्भात कोणताही बेजबाबदारपणा खपवून घेणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST2021-09-09T04:29:47+5:302021-09-09T04:29:47+5:30
इचलकरंजी : सध्या सणासुदीचे दिवस असून आधीच कोरोना, महापुरासह अन्य साथीच्या आजारांशी नागरिकांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील ...

आरोग्यासंदर्भात कोणताही बेजबाबदारपणा खपवून घेणार नाही
इचलकरंजी : सध्या सणासुदीचे दिवस असून आधीच कोरोना, महापुरासह अन्य साथीच्या आजारांशी नागरिकांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करून साथीच्या आजारावर नियंत्रण आणावे. प्रभागात घंटागाडी व दैनंदिन कचरा उठाव आदींमध्ये नियमितता ठेवावी.
आरोग्यासंदर्भात कोणताही बेजबाबदारपणा खपवून घेणार नाही, अशा सक्त सूचना नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी बुधवारी आरोग्य विभागाच्या बैठकीत केल्या.
शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. तसेच या भागातील दैनंदिन कचरा उठावाबाबत व घंटागाडी वेळेत येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. पावसाळ्यामुळे साथीचे आजार पसरू लागल्याने आरोग्य विभागाने स्वच्छतेत गय करू नये. प्रत्येक भागात सारण गटारींची स्वच्छता व औषध व धूर फवारणी करावी. प्रत्येक भागात दैनंदिन कचरा उठावासह घंटागाडी नियमित व वेळेत फिरवून घरातील कचरा स्वीकारावा. आरोग्याच्या कामासंदर्भात पुन्हा तक्रारी प्राप्त होऊ नयेत, अशी सक्त ताकीद नगराध्यक्षा स्वामी यांनी आरोग्य विभागातील सर्वच अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी यांना दिली. या बैठकीस आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, नगरसेवक किसन शिंदे, विश्वास हेगडे, सूर्यकांत चव्हाण, विजय पाटील आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी
इचलकरंजी : नगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या बैठकीत नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी अधिकारी व कर्मचारी यांना सूचना केल्या.