कोल्हापूर/अमरावती : ‘महादेवी’ हत्तीण प्रकरणामध्ये शासनाने कुठलाही थेट आदेश दिलेला नाही. मात्र, नांदणी परिसरातील भाविकांच्या भावना लक्षात घेऊन, या प्रकरणी मुंबईत उद्या (मंगळवारी) बैठक आयोजित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ‘महादेवी’ प्रकरणीही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘मुळात हा शासनाचा निर्णय नाही. प्राण्यांविषयी काम करणारे कार्यकर्ते आणि संबंधित मठ यांच्यात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. यासाठी उच्च न्यायालयाने एक उच्चाधिकार समिती नेमली. त्यांनी या हत्तिणीला अभयारण्यामध्ये सोडण्याची सूचना केली. त्यानुसार उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयानेही कायम केला आणि महाराष्ट्रात असे अभयारण्य नसल्याने ‘वनतारा’मध्ये हत्तिणीला ठेवण्याचा निर्णय त्यांनी दिला. त्यानुसार हत्तिणीला तिकडे नेले. फक्त न्यायालयीन कामकाजासाठी वन विभागाचा आवश्यक अहवाल तेवढा देण्यात आला होता. बाकी कुठेही यामध्ये शासनाची भूमिका नाही. परंतु, नांदणी परिसरातील भाविकांच्या भावना या हत्तिणीमध्ये गुंतल्या आहेत.
कोल्हापुरात सर्वधर्मीय रस्त्यावर नांदणी (ता.शिरोळ) येथील मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीण परत द्या, अशी हाक देत, नांदणी ते कोल्हापूर मूक मोर्चात सर्वधर्मीय हजारो नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले. ‘एक रविवार महादेवीसाठी’ असे म्हणत लहान मुले, वयोवृद्धांसह तरुण मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. ‘महादेवी’ला परत आणूनच गप्प बसू, असा इशारा देत मोर्चा कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. नांदणी मठातील ‘महादेवी’ हत्तीण गुजरात येथील ‘वनतारा’ येथे नेल्यानंतर शिरोळ तालुक्यातून त्या विरोधात उठाव सुरू झाला. पहाटे साडेपाच वाजता नांदणी मठातून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. साधारणत: साडेतीन वाजता मोर्चा कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. छाया : नसीर अत्तार