पाच जिल्ह्यात ‘नो डॉल्बी’
By Admin | Updated: July 30, 2015 00:47 IST2015-07-30T00:42:40+5:302015-07-30T00:47:24+5:30
संजय वर्मा : डॉल्बी लावल्यास कारवाई

पाच जिल्ह्यात ‘नो डॉल्बी’
कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांतील सकारात्मक प्रतिसादामुळे कोल्हापुरात यशस्वी ठरलेल्या ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची परंपरा यंदा कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्णांत राबविण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने केला आहे. त्यासाठी येथून पुढे कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये डॉल्बी लावल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना दिले असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
डॉल्बीचे दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहेत. त्यामुळे कोणत्याही समारंभात डॉल्बी लावण्यास परवानगी नाकारली जाणार आहे. निवडणुका असो किंवा राजकीय व्यक्तींचा दहीहंडीचा कार्यक्रम असो, डॉल्बी लावण्यास सक्त मनाई केली जाणार आहे. डॉल्बीवर वेळीच निर्बंध न घातल्यास आगामी गणेशोत्सवामध्ये डॉल्बी लावण्यास तरुण मंडळे सक्रिय होतील. त्यामुळे ४ आॅगस्टपासून होणाऱ्या त्र्यंबोली यात्रेमध्येही डॉल्बी लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच आगामी गणेशोत्सवात डॉल्बीचा वापर करू नये, यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या जिल्ह्णांतील सर्व सार्वजनिक तरुण मंडळांच्या अध्यक्षांना नोटिसा पाठवून जनजागृती केली जाणार आहे. तसेच डॉल्बीसंबंधी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व सार्वजनिक तरुण मंडळांची विशेष बैठक बोलाविण्याचे आदेशही पोलीस अधीक्षकांना दिले आहेत, असे वर्मा यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)